
कोळकी (ता. फलटण) येथील पृथ्वी चौक ते दहिवडी रोडवरील सुरू असलेल्या पुलाच्या कामाची स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर आणि भाजप जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी पाहणी केली. ग्रामस्थांच्या मागणीनुसार पुलाच्या उंचीबाबत आणि पाण्याच्या निचऱ्याबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मक ग्वाही दिली आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 6 मार्च : पृथ्वी चौक (पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी चौक) ते दहिवडी रोडवर कोळकी येथे सध्या पुलाचे काम वेगात सुरू आहे. या पुलाची उंची वाढवावी, अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी होती. या अनुषंगाने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या सूचनेनुसार, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह (भैय्या) नाईक निंबाळकर आणि भाजपा सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी बुधवारी या पुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी अमरसिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार शिंदे यांनी ग्रामस्थांसमवेत संबंधित कंपनीचे अधिकारी त्यागी साहेब यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
‘पाण्याचा योग्य निचरा होईल, पुलावरून पाणी वाहणार नाही’
बुवासाहेब नगर ओढ्यावरील पुलाची उंची वाढवावी, अशी ग्रामस्थांची प्रमुख मागणी होती. यावर बोलताना अधिकारी त्यागी यांनी स्पष्ट केले की, कितीही मुसळधार पाऊस झाला तरी ओढ्याचे पाणी अतिशय व्यवस्थितरित्या वाहून जाईल, अशाच पद्धतीने या पुलाचे डिझाईन करण्यात आले आहे.
तसेच, आरटीओ (RTO) ऑफिसच्या समोर असणारा पूल आणि बुवासाहेब मंदिर येथे असणारा पूल या दोन्ही पुलांच्या बाजूला संरक्षक भिंत (वॉल) बांधून पाण्याचा योग्य निचरा होईल, याची पूर्ण काळजी घेतली जाणार आहे. आवश्यक त्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात येणार असून, कितीही पाणी आले तरी ते पुलावरून वाहणार नाही, असे ठोस आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. रस्त्याचे कामही दर्जेदार करून ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचा शब्द अधिकाऱ्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिला.
खड्डा बुजवून मुख्य पुलावरून वाहतूक सुरू करण्याच्या सूचना
सध्या आरटीओ ऑफिसच्या समोरून वाहतुकीसाठी जो तात्पुरता पूल (डायव्हर्शन) उभारण्यात आला आहे, त्या ठिकाणी एक मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा तातडीने बुजवण्यात यावा आणि सुरक्षिततेची काळजी घेऊन तेथील मुख्य पुलावरून येणाऱ्या काही दिवसांतच वाहतूक सुरू करावी, असे स्पष्ट निर्देश अमरसिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
या पाहणी दौऱ्यावेळी संदीप नेवसे, रणजित जाधव, राजेंद्र खिलारे, किरण जाधव, किरण पखाले, गोरख जाधव, बाळासाहेब रिटे, रणजीत काशीद, वैभव गंगतिरे, सौरभ जाधव यांच्यासह परिसरातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
