दैनिक स्थैर्य । दि. ०४ एप्रिल २०२३ । अमरावती । अमरावती- बडनेरा राज्यमार्गावरील इर्विन ते राजापेठ उड्डाण पूलावरील विस्तार सांध्याच्या ठिकाणी रबर पॅड झिजून निकामी झाले. हे काम कालमर्यादेत पूर्ण करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज दिले.
विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करुन दुरुस्तीच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता रुपा गिरासे, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहेत्रे, महापालिकेचे अभियंता यांच्यासह कार्यान्वयन यंत्रणांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
शहरातील इर्विन चौकाकडून राजापेठेकडे जाणा-या 1 हजार 320 मीटर लांबीच्या उड्डाण पुलाचे बांधकाम राज्य रस्ते विकास महामंडळांतर्गत 2008 मध्ये पूर्ण झाले. पुलावर दि. 30 मार्च रोजी स्तंभ क्र. 32 मधील वळणाकार ठिकाणी विस्तार सांध्यामधील (एक्स्पान्शन जॉईंट) मधील रबर पॅडची झीज होऊन निकामी झाले. त्यानुसार यापूर्वी औरंगाबाद येथील संकल्पचित्र विभाग (पूल) येथील कार्यकारी अभियंता व अमरावती सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता यांनी स्थळपाहणी केली आहे. पुलाचे स्ट्रक्चर सुस्थितीत आहे. रबर पॅड बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम कालमर्यादेत पूर्ण व्हावे, असे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले.
पुलाचे स्ट्रक्चर सुस्थितीत असून पुलाची कुठलाही हानी झाली नाही. सांध्यांना जोडणा-या रबर पॅडची कालमर्यादा साधारणत: बारा वर्षे इतकी असते. पुलाचा विस्तार व क्षमता पाहता रबर पॅडची कालमर्यादा वेगवेगळी असू शकते. सदर पॅड निकामी झाल्यामुळे ते लवकरच बदलण्यात येऊन वाहतूक पूर्ववत सुरळीत होईल, असे श्री. मेहेत्रे यांनी सांगितले.