
गतवर्षीच्या त्रुटी टाळण्याच्या प्रशासनाला दिल्या सूचना
स्थैर्य, सातारा, दि. 25 : साताराकर गौरी-गणपतीचा सण साजरा करत असतानाच सातारा पालिकेने विसर्जनाच्या दृष्टीने नियोजन सुरू केले आहे. मंगळवारी नगराध्यक्षा माधवी कदम व उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी मंगळवारी बुधवार नाका परिसरातील कृत्रिम तळ्याची पाहणी केली. तळ्यांची देखभाल दुरुस्ती आणि तळ्यातील कागदाच्या अस्तराला गळती लागू नये, यासाठी प्रशासनाने काळजी घ्यावी, अशा सूचना नगराध्यक्षा माधवी कदम यांनी केल्या.
दरम्यान, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी तळ्यासाठी उपलब्ध पाणीपुरवठयाची माहिती घेतली पाणीपुरवठा सभापती, यशोधन नारकर नियोजन सभापती, ज्ञानेश्वर फरांदे, मुख्याधिकारी, अभिजीत बापट, नगर अभियंता भाऊसाहेब पाटील, अनंत प्रभुणे व सुधीर चव्हाण अभियंते यावेळी उपस्थित होते.
गणपती विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या बुधवार नाका, हुतात्मा स्मारक, दगडी शाळा व गोडोलीतील कृत्रीम तळ्यांची यावेळी पाहणी करण्यात आली. बुधवार नाका येथील मुख्य तळ्याला 55 लाख लिटर पाण्याची गरज आहे. गतवर्षी तळ्यातील कागद फाटून तळ्याला गळती लागण्याचा प्रकार घडला होता. मागील वर्षी ज्या काही त्रुटी समोर आल्या होत्या, त्यांची पुर्तता करण्यासंदर्भात सुचना नगराध्यक्षांनी केल्या. सध्याच्या कोरोनाच्या सारख्या महाभयंकर साथीची काळजी घेऊन बाप्पांचे विसर्जन करता येईल, कशी व्यवस्था करता येईल याची चर्चा उपनगराध्यक्षांनी मुख्याधिकारी बापट यांच्याशी केली.