स्थैर्य, सातारा, दि.०३: सातारा तालुक्याच्या पश्चिमेकडील व पाटण तालुक्यातील तारळे खोर्यात निलगिरी, बाभूळ झाडाच्या नावाखाली जांभूळ, आंबा, फणस, सागवान, खैर, काटेशिवर आदी झाडांची बेसुमार कत्तल सुरू असल्याने या परिसरातील डोंगर व खाजगी मालकीची जंगले उजाड होऊ लागली आहेत. दिवसाढवळ्या वृक्षांची कत्तल करून रात्रीच्या वेळी तोडलेली वनसंपदा बिनधास्त पणे सातारा तालुक्यातील एका कंपनीत बॉयलरसाठी पोहचू लागली आहे. मात्र, याकडे वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून पर्यावरण प्रेमींकडून या चोरट्या वृक्ष तोडीला लगाम घालावा अशी मागणी होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा तालुक्यातील पश्चिमेकडील व पाटण खोर्यातील तारळे भाग हा तसा दुर्गम भाग आणि डोंगरी विभाग म्हणूनच पहिले जाते.या विभागात वनविभागासह खाजगी मालकीच्या हद्दीतील आणि शेतकर्यांच्या शेताकडेला मोठ्या प्रमाणात आंबा, जांभूळ, साग, खैर, ऐन आदी प्रकारच्या झाडांची निलगिरी आणि बाभूळ झाडांच्या नावाखाली वन विभागाची कसलीही परवानगी न घेता विना परवाना बेसुमार कत्तल करण्याचे काम दिवसाढवळ्या सुरू असली तरी याचा कोणताही मागमूस वनखात्याच्या कर्मचार्यांना का लागला नाही? की लागूनही ’अर्थपूर्ण’तडजोडी मुळे याकडे दुर्लक्ष केले जात तर नाही ना? असा संशय परिसरातील नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.त्यामुळे वृक्ष प्रेमी आणि पर्यावरण प्रेमींतून तीव्र नाराजी पसरली आहे.
या विभागातील दुर्गम ठिकाणी झाडांची दिवसा कत्तल करून रात्रीच्या सुमारास ट्रक, ट्रॅकट्र ट्रॉली, टेम्पोच्या माध्यमातून सातारा तालुक्यातील राष्ट्रीय म्हामार्गालगत असणार्या मोठ्या कंपनीत बॉयलर साठी विकले जात आहे. या कंपनीत मोठं मोठ्या लाकूड वखार मालकांच्याकडून सुमारे वार्षिक 5 हजार टन इतका साठा केला जात असतो. सदर साठ्यास किंवा झाडे तोडण्यास वन खात्याने रीतसर परवानगी दिली आहे काय?दिली नसेल तर संबधीतांवर कारवाई का केली जात नाही ?असे अनेक प्रश्न नागरिकांमधून विचारले जात आहेत. खरे तर निलगिरी, बाभूळ ही झाडे तोडण्यासाठी परवानगीची गरज लागत नाही मात्र सदरची झाडे तोडत असताना वन विभागाच्या हद्दीतील ही झाडे मोठ्या प्रमाणात तोडली जात आहेत यामुळे या परिसरातील डोंगर उघडे बोडके होत आहेत. परिणामतः पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात हानी पोहचत आहे.
संपूर्ण राज्यात पर्यावरणाचा बिघडलेला समतोल साधण्यासाठी वन अन सामाजिक वनीकरण विभागामार्फत कोट्यवधी खर्च करून झाडे लावा,झाडे जगवा मोहीम राबविली जात आहे.मात्र सामाजिक वनीकरणाच्या या मोहिमेला एकप्रकारे हरताळ फासण्याचेच काम सध्या सुरू असून वन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी या बेसुमार चाललेल्या वृक्ष तोडीस लगाम घालावा अशी मागणी पर्यावरण प्रेमी यांच्याकडून होत आहे.