दैनिक स्थैर्य । दि.३१ डिसेंबर २०२१ । फलटण । अत्याधुनिक तंत्र प्रणालीचा वापर करून स्वच्छता कार्यात सुधारणा घडवून आणणाऱ्या नव्या संकल्पनांची निर्मिती करणे आणि या स्वच्छता संकल्पनांचा प्रत्यक्ष उपयोग समाज, वार्ड व शहर पातळीवर करणे हे उद्दिष्ट फलटण नगरपालिकेने नजरेसमोर ठेवले आहे. यामधून स्वच्छता विषयक नवनव्या संकल्पनांचा उदय होईल व शहर स्वच्छता कार्याला लोकसहभागातून अधिक गतिमानता लाभेल. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता नागरिकांकडून कचरा संकलन, कचऱ्याची विल्हेवाट, कचऱ्यापासून खत निर्मिती, कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया, प्लास्टिक कचऱ्याचे सुयोग्य व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन प्रणालीत सुधारणा, लोकसभाग वाढी करता संकल्पना, अशा कचरा व स्वच्छतेशी संबंधित विविध बाबीवरील नाविन्यपूर्ण तांत्रिक प्रकल्प सादर करावेत, असे आवाहन मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी यावेळी केले.
फलटण नगरपरिषदेच्या वतीने फलटण शहरामध्ये “माझी वसुंधरा” व “स्वच्छ सर्वेक्षण” याच्या अंतर्गत स्वच्छ इनोव्हेटिव टेक्नॉलॉजी चॅलेंज स्पर्धा आयोजित केलेली आहे. या संदर्भात श्रीमती वेणूताई चव्हाण फार्मसी कॉलेजमध्ये कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी विद्यार्थ्यांशी समक्ष सवांद साधून स्पर्धेबाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेस बांधकाम विभागाचे संजय सोनवणे, आरोग्य विभागाचे प्रकाश तुळसे, सिटी कॉर्डीनेटर श्रीमती शैला पोळ, प्रशालेचे प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
स्वच्छ सर्वेक्षण 2021-22 ची शुभारंभ फलटणमध्ये करण्यात आलेला आहे. या संदर्भात सर्व नगरपरिषदेचे विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी यांची बैठक आयोजित करून स्वछ सर्वेक्षणामध्ये करावयाच्या कामाच्या सूचना फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर मागील वर्षात स्वच्छ सर्वेक्षणामधील उणिवांबाबत चर्चा करण्यात आली. माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत फलटण शहरातील सर्व बँकर्स यांच्या सहभागाबाबत बैठक घेणेत आली.
सदर स्पर्धेमध्ये शहरातील नागरिक, सामाजिक संस्था, मंडळे, विद्यार्थी, स्टार्ट अप्स, कंपनी आणि शैक्षणिक संस्था इत्यादी सहभाग घेऊ शकतात. वरील स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांकास सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.