दैनिक स्थैर्य । दि. ०२ मार्च २०२२ । मुंबई । सामान्य नागरिकांना चांगल्या प्रतीच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश करा, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.
सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाच्या प्रकल्प अंमलबजावणी आराखड्याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. आरोग्य भवनमधील सभागृहात झालेल्या बैठकीस आरोग्य सेवा आयुक्त डॉ. एन. रामास्वामी, अतिरिक्त अभियान संचालक डॉ. सतीश पवार, संचालक डॉ साधना तायडे, सहसचिव श्री.आत्राम, लहाने, आदी उपस्थित होते.
अतिरिक्त अभियान संचालक डॉ. पवार यांनी प्रथम प्रकल्प अंमलबजावणी आराखड्याचे सादरीकरण केले. आराखड्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी आराखड्यात नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश करावा. त्यासाठी इतर राज्यांच्या आराखड्याचा अभ्यास करावा. आरोग्य क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या राज्यातील चांगल्या उपक्रमांची माहिती घेऊन त्याचा आराखड्यात समावेश करता येईल का याबाबत विचार करावा, अशा सूचना केल्या.
आरोग्य योजनांचे मूल्यमापन करण्यात यावे. कारण असे मूल्यमापन करणे आरोग्य सेवांत सुधारणा करण्यासाठी उपयुक्त ठरत असते. त्यामुळे विविध आरोग्य योजनांचे मूल्यमापन करुन त्यामध्ये सुधारणा करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
आरोग्य यंत्रणेला सक्षम करण्यासाठी जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा समावेश करावा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, टेलिमेडिसीन, टेलिरेडिओलॉजी या तंत्रज्ञानाचा आराखड्यात समावेश करावा. जेणेकरून राज्यातील दुर्गम भागात अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करता येईल, असे त्यांनी सांगितले.
बैठकीस सहसंचालक डॉ विजय कंदेवाड, डॉ.नितीन अंबाडेकर, संजय सरवदे, श्रीमती रेहाना काझी, सहाय्यक संचालक श्रीमती करुणा सुरवाडे, राज्य प्रकल्प व्यवस्थापक डॉ. अभिजित अहिरे आदी उपस्थित होते.