दैनिक स्थैर्य । दि. 29 सप्टेंबर 2024 । फलटण । येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भुसार कांदा मार्केटमध्ये सध्या नवीन हळवा व गारवा कांदा येवू लागला आहे. तरी येणारा कांंदा प्लास्टिक पिशव्यामध्ये न आणता नवीन सुतळी गोणीमध्ये आणुन शेतकर्यांनी खरेदीदारांना द्यावा यामुळे येणार्या नव्या कांद्याला योग्य तो दर देता येईल परराज्यात असणार्या बाजारपेठेमध्ये सुध्दा सुतळी गोणीमध्येच कांद्याला मागणी आहे. म्हणून सर्व कांदा उत्पादक शेतकर्यांनी प्लॅस्टिमुक्त फलटणची कांदाबाजार पेठ करण्यासाठी पुढाकार घेत प्लॅस्टिक मुक्त बाजारपेठेचे मानकरी व्हावे असे आवाहन भुसार कांदा अडत व्यापारी असोसिएनशचे नवनिर्वाचिन अध्यक्ष चेतन घडिया यांनी केले.
काल फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेत भूसार कांदा अडत व्यापारी असोसिएशन व फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकर्यांसाठी एका पत्रकाचे प्रकाशन आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी माहिती देताना अध्यक्ष चेतन घडिया बोलत होते यावेळी उपाध्यक्ष राजेश शहा, सचिन धिरेन शहा यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थितीत होती.
यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दिपक चव्हाण, बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सदरील उपक्रमाचे कौतुक करीत शेतकर्यांनी प्लॅस्टिक पिशव्या न वापरता कांद्यासाठी सुतळी गोणी वापरण्याचे आवाहन केले.