स्थैर्य, सातारा, दि. ०४ : सज्जनगड येथील श्री रामदासस्वामी संस्थानच्यावतीने मनाचे श्लोक पाठांतराच्या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चार गटात या स्पर्धा होणार आहेत. प्रत्येक गटातून पाच विजेते आणि पाच उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येणार आहेत. या उपक्रमाचे संपर्क प्रमुख आनंद कुलकर्णी यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी आणि खुला अशा चार गटात या स्पर्धा होत आहेत. प्रत्येक स्पर्धकाने दर आठवड्याला पाच याप्रमाणे 205 मनाचे श्लोक पाठ करुन म्हणायचे आहेत आणि त्याचा स्पर्धकाने आपल्या घरातच मोबाईलवर केलेला व्हिडीओ दर आठवड्याला संपर्क प्रमुखांना पाठवायचा आहे. पाठांतर, शब्दोच्चार, सादरीकरण, हावभाव आणि सातत्य या गोष्टी विचारात घेवून स्पर्धकांना गुण देण्यात येणार आहेत. एक्केचाळीस आठवड्यानंतर सर्व गुणांची बेरीज करुन विजेते घोषित केले जाणार असून या सर्वांना सज्जनगडावर संस्थानच्यावतीने मानपत्र आणि श्री समर्थ प्रसाद देवून गौरविण्यात येणार असल्याची, माहितीही श्री कुलकर्णी यांनी दिली.
या स्पर्धेतील सहभागासाठी कसलेही शुल्क नाही. 15 ऑगस्ट ही स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन प्रवेशिका पाठविण्याची अंतिम मुदत असून सहभागी होवू इच्छिणा-यांनी अधिक माहितीसाठी 7744964550 या व्हॉटस अँप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.