
स्थैर्य, फलटण, दि. 11 ऑक्टोबर : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ‘इनोव्हेशन २K२५’ प्रोजेक्ट स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला. ८ राज्यांतील सुमारे ३ हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमासाठी एनआयसीएमएआर युनिव्हर्सिटी, पुणेच्या कुलगुरू डॉ. सुषमा कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, तर गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी अध्यक्षस्थान भूषवले. आपल्या मार्गदर्शनात डॉ. कुलकर्णी यांनी सामाजिक आव्हानांवर लक्ष केंद्रित करून कल्पनांना वास्तवात उतरवण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
स्पर्धेतील विजेते:
- पदवी (डिग्री) स्तर:प्रथम क्रमांक: ‘व्हीआर सायबरक्राईम सीन इन्वेस्टिगेशन लॅब’ (जी.एच. रायसोनी कॉलेज, पुणे)
- द्वितीय क्रमांक: ‘एपिकेअर’ – स्मार्ट आरोग्य सेवा प्रणाली (अजिंक्या डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग)
- पदविका (डिप्लोमा) स्तर:विजेते: ‘स्मार्ट असाइन सिस्टम’ (राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस) आणि ‘कॅलरिफी’ आरोग्य ट्रॅकिंग ॲप (राजाराम शिंदे इन्स्टिट्यूट)
- उपविजेते: कर्णबधिर व्यक्तींसाठी ‘स्मार्ट हँड ग्लोव्ह्स फॉर साइन इंटरप्रिटेशन’ (झील पॉलिटेक्निक, पुणे) आणि ‘स्वयं-चार्जिंग इलेक्ट्रिक व्हेहिकल’ (एस.व्ही.पी.एम. इन्स्टिट्यूट, माळेगाव)
या स्पर्धेमुळे देशभरातील नवनवीन कल्पनांना राष्ट्रीय व्यासपीठ मिळाल्याचे अध्यक्षीय भाषणात अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी नमूद केले. स्पर्धेला कमिन्स इंडिया, गोविंद मिल्क, ॲसेंट सॉफ्टेक, एसबीआय आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांसारख्या संस्थांनी प्रायोजक म्हणून सहकार्य केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोजकुमार दळवी यांनी प्रास्ताविक केले, तर प्रा. अमरसिंह रणवरे यांनी आभार मानले. प्रा. रूजल दोशी यांनी सूत्रसंचालन केले.