मराठा समाजावरील अन्याय दूर करावा; मराठा क्रांती मोर्चा फलटणच्यावतीने श्रीमंत रामराजेंकडे मागणी
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना निवेदन प्रत देताना माऊली सावंत, नानासाहेब पवार व अन्य मान्यवर.
स्थैर्य, फलटण : मराठा समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये मिळालेल्या आरक्षणाची जबाबदारी घेवुन महाराष्ट्र शासनाने सदर आरक्षण सुरु ठेवण्यासाठी अध्यादेश काढावा तसेच सर्वोच्च न्यायालयात पुर्नयाचिका दाखल करुन अंतरिम निर्णयावर पुर्नविचार करण्यासाठी पुर्नयाचिकेद्वारे मराठा समाजावरील अन्याय दूर करावा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा फलटणच्यावतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मराठा क्रांती मोर्चा फलटणचे मार्गदर्शक माऊली सावंत, मराठा सेवा संघाचे नानासाहेब पवार व मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी यांनी आज या निवेदनाच्याप्रती महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दिपक चव्हाण यांना समक्ष देवून या प्रश्नात राज्य शासनाला अध्यादेश काढण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सहकार मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, खा. श्रीनिवास पाटील, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना या निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.