दैनिक स्थैर्य । दि. १५ मार्च २०२२ । मुंबई । शासनाच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत आयोजित चित्रमय प्रदर्शन माहितीपूर्ण आणि आकर्षक असून या प्रदर्शनामुळे शासनाचे निर्णय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.
कोरोनासारख्या जागतिक संकटाच्या काळात शासनाने सामान्य जनतेला मदतीचा हात देण्याबरोबरच प्रत्येक क्षेत्रात लोकाभिमुख निर्णय घेऊन काम केले. शासनाला नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शासनाच्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती देणाऱ्या ‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ या संकल्पनेवर आधारित चित्रमय प्रदर्शनाचे मंत्रालयाच्या त्रिमुर्ती प्रांगणात आयोजन केले आहे. श्री.ठाकरे यांनी आज (मंगळवारी) या प्रदर्शनास भेट दिली. किल्ल्याच्या भिंतींच्या पार्श्वभूमीवर उभारलेल्या चित्रमय प्रदर्शन फलकांच्या संकल्पनेचे त्यांनी आवर्जून कौतुक केले. प्रदर्शनातील सर्व विभागांच्या फलकांजवळ थांबून त्यांनी सविस्तर चर्चा केली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांनी यावेळी त्यांना प्रदर्शनाबाबत माहिती दिली. संचालक (प्रशासन) गणेश रामदासी, संचालक (वृत्त व जनसंपर्क) दयानंद कांबळे, उपसंचालक श्रीमती सीमा रनाळकर आदी यावेळी उपस्थित होते.
या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या 360 डिग्री व्हिडीओ सेल्फी पॉईंटबद्दल कौतुकाने चौकशी करून श्री.ठाकरे यांनी उत्साहाने व्हीडिओ सेल्फी काढून घेतला. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने हे प्रदर्शन राज्यभर व राज्याबाहेर दिल्लीतही आयोजित करावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
या प्रदर्शनात पर्यावरण, पर्यटन या विभागाने केलेल्या कामगिरीबरोबरच आरोग्य, मदत व पुनर्वसन, कृषी, उद्योग आदी विविध विभागांच्या निर्णयांच्या फलकांची आणि संबंधित छायाचित्रांची त्यांनी आवर्जून पाहणी केली.