दैनिक स्थैर्य । दि.१४ जानेवारी २०२२ । सातारा । सातारा तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे. 125 रुग्णांवरुन 250 रुग्ण झालेले आहेत. रुग्णवाढ होत असली तरीही लसीकरण मोठयाप्रमाणावर सुरु आहे. मुलांचे 55 टक्के लसीकरण झाले आहे, असा आढावा आरोग्य विभागाच्यावतीने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार यांनी सातारा पंचायत समितीच्या मासिक सभेत मांडला. दरम्यान, सातारा पंचायत समितीमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने मुख्य दरवाजाला कुलूप लावून सभागृहात ऑफलाईन सभा घेतल्याने पाच पेक्षा जास्त जण एकत्र येण्याच्या नियमाला हरताळ फासला गेल्याची चर्चा सुरु होती.
सातारा पंचायत समितीची मासिक सभा सभापती सरिता इंदलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती अरविंद जाधव, सदस्य दयानंद उघडे, रामदास साळुंखे, राहुल शिंदे, जितेंद्र सावंत, विद्या देवरे यांच्यासह सदस्य उपस्थित होते. यावेळी आरोग्य विभागाच्यावतीने डॉ. पवार यांनी आढावा मांडला. पहिला डोस 106 टक्के प्रमाण झालेले आहे. तर दुसरा डोस 77 टक्के जणांचे झालेले आहेत. कोरोना बाधित रुग्ण वाढत असल्याने त्यावर यंत्रणा सज्ज आहे. क्षेत्र माहुली येथे कोव्हिड सेंटर सज्ज ठेवण्यात आलेले आहे, असेही त्यांनी सांगितले. विद्युत विभागाच्या आढाव्यात धोकादायक तारांचा ताण काढून घेण्यात यावा अशी मागणी सदस्यांनी केली. पशुसंवर्धन विभगाचे डॉ. वाघ यांनी किसान क्रेडीट कार्डची योजना सांगितली. ग्रामपंचायत विभागाच्या आढाव्यादरम्यान 14 व्या वित्त आयोगातील निधी अखर्चित राहिला आहे. तो ज्या ग्रामसेवकांकडून खर्च झाला नाही. त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सदस्यांनी केली.
जिल्हाधिकाऱयांनी कोरोनाची नवी नियमावली काढली गेली. त्याच नियमावलीमध्ये पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येवू नये असे म्हटले गेले, पंचायत समितीचे सभागृह अगोदरच अरुंद त्यात सभा घेण्यात आली. पंचायत समितीचे एका गेटला कुलूप लावून आत गर्दी केल्याने नियमांचे उल्लंघन केल्याची जोरदार चर्चा सुरु होती.