पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावर चौथी मार्गिका करण्याबाबत विचार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती


दैनिक स्थैर्य । दि. २२ ऑगस्ट २०२२ । मुंबई । मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या चौथ्या मार्गिकेच्या विस्तार करण्याबाबत राज्य शासन विचार करेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक खूप वाढली आहे. या महामार्गावरील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी इंटेलिजन्ट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंमलात आणली जाईल. या सिस्टीम मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जाईल. यामुळे लेन सोडून वाहतूक करणाऱ्या ट्रॉलरची माहिती तत्काळ मिळेल. अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळण्यासाठी यंत्रणा विकसित करण्यात येईल. या यंत्रणेत जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घेतला जाईल. अपघात टाळण्यासाठी प्रशिक्षण आणि जनजागृती मोहीम राबवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

महामार्गावर झालेल्या अपघातामुळे झालेल्या आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यूची चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांना मदत मिळण्यात काही उणिवा राहिल्या का हे तपासण्यासाठीही अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

याबाबतच्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार, वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात यांनी सहभाग घेतला.


Back to top button
Don`t copy text!