विराटगडाच्या पायथ्याशी हे म्हसवे गाव आहे. हा भाग जावळी तालुक्यामध्ये किंवा सातारा जिल्हात आहे. म्हसवे गावाच्या बाहेर एका जागेला कंपाउड घातलेले दिसते व तेथे एक भला मोठा सरकारी बोर्ड आहे. त्यावर ह्या वटवृक्षाची माहिती लिहिलेली आहे.
सातारा जिल्ह्यातील म्हसवे (ता. जावळी) येथील वटवृक्षाचा “वंश‘ तब्बल अडीच एकर परिसरात विस्तारला असून, तो विस्ताराने आशिया खंडात दुसऱ्या क्रमांकाचा आहे. पाचवड-कुडाळ रस्त्यावर पाचवडपासून पाच किलोमीटर अंतरावर म्हसवे गावानजीक हे वडाचे झाड आहे. या गावात देशातील सर्वांत जुने आणि विस्ताराने मोठे असे वडाचे झाड आहे. या वटवृक्षामुळेच गावाला “वडाचे म्हसवे‘ या नावाने ओळखले जाते. या वटवृक्षाची ब्रिटिशकालीन “फ्लोरा ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी‘मध्ये प्रथम क्रमांकाचा वटवृक्ष म्हणून नोंद आहे. 1882 मध्ये ली वॉर्नर या ब्रिटिश अधिकाऱ्याने सातारा जिल्ह्यातील या वडाच्या झाडाचा उल्लेख केला आहे. 1903 मध्ये पुण्याच्या सायन्स कॉलेजचे प्राचार्य असलेल्या कूक थिओडोर या ब्रिटिशाने पश्चिम घाटावरील वृक्षाची नोंद असलेले पुस्तक लिहिले आहे. त्यातही या वृक्षाची नोंद आहे.
विस्ताराने मोठ्या असलेल्या या वटवृक्षावर पशुपक्ष्यांचे मोठ्या संख्येने वास्तव्य असते. वटवाघूळ, बुलबुल, सातभाई, भारद्वाज आदी 28 प्रजातींचे वास्तव्य आढळते. झाडाच्या सुमारे शंभर पारंब्यांचे खोडात रूपांतर झाले आहे. त्यामुळेच सुमारे दोनशे वर्षांहून अधिक काळाचे हे झाड अद्याप टिकून आहे.
वडच का लावावा?
-एक परिपूर्ण वड सुमारे 35 हजार जिवांना अभय-आश्रय देतो.
-पाच वातानुकूल यंत्रे उघड्या वातावरणात 24 तास चालू ठेवल्यावर त्याचा वातावरणावर जो परिणाम दिसून येईल तो परिणाम एक पूर्ण वाढ झालेले वडाचे झाड देते.
-जिथे वड, तेथील एक किलोमीटर परिसरात हमखास पाणी सापडते.
पेशवे यांची जुनी पोस्ट (संजय कोल्हटकर)