दैनिक स्थैर्य । दि. ०८ नोव्हेंबर २०२२ । मुंबई । प्रधानमंत्री गतीशक्ती योजना पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. आपल्याकडे विविध योजनांची माहिती उपलब्ध आहे. तथापि संबंधित विभागांनी ही माहिती एका पोर्टलवर एकत्रित ठेवावी. यासाठी महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लीकेशन सेंटरने (एमआरसॅक) सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेच्या अनुषंगाने राज्यातील विविध प्रकल्पांची माहिती एकत्रित उपलब्ध व्हावी, यासाठी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. या बैठकीस उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, अपर मुख्य सचिव नितीन करीर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, एमआरसॅकचे संचालक डॉ. ए.के.जोशी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, राज्यात पायाभूत सुविधांसह विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांना प्रधानमंत्री गती शक्ती योजनेशी जोडण्यासाठी त्या प्रकल्पांची माहिती एकत्रितपणे पोर्टलवर ठेवणे गरजेचे आहे. यादृष्टीने नियोजन करून तातडीने ही सर्व माहिती अपलोड करण्यात यावी. सर्व विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासाठी प्राधान्याने पुढाकार घ्यावा. तसेच एमआरसॅकला ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.