स्थैर्य, सातारा, दि. 02 : कोंडवे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणार्या दिव्यनगरी भागात एका युवकाला कोरोनाची लागण झाल्याने दिव्यनगरी भागात भीती पसरली आहे. मंजुळा सोसायटीतील हा 40 वर्षीय बाधित युवक सातारा बाजार समिती येथे कामावर ये-जा करत होता. तेथेच भाजी मंडईतील बाधिताच्या संपर्कात आल्याने या युवकाला बाधा झाल्याचे समजते. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून या पेशंटला कणकणी, कोरडा खोकला अशी लक्षणे जाणवत होती. घसा खवखवणे वगैरे असा त्रास होत असल्याने तेथील स्टाफच्या सांगण्यानुसार या पेशंटने 30 जुलै रोजी लक्ष्मीटेकडी, सदरबझार, सातारा येथे स्वॅब तपासणी कॅम्पमध्ये तपासणी केली असता त्याची रॅपिड अँटिजेन टेस्ट पॅाझिटिव्ह आल्याचे कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुदर्शनकुमार मेहता यांनी सांगितले.
त्यानंतर लगेचच कोंडवे ग्रामपंचायतीने सर्व उपाययोजना करून येथील 250 मीटरचा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. अंतर्गत रस्ता सुद्धा बंद करण्यात आला आहे. यावेळी कोंडवे सरपंच सौ. शोभा भुजबळ, उपसरपंच महेश गाडे, ग्राम विकास अधिकारी सौ. सुचित्रा म्हस्के, तलाठी पेंडसे, पोलीस पाटील बाबुराव गायकवाड, आरोग्य सेवक विशाल शिंदे, आशा सेविका सौ. मुधोळकर, दत्तात्रय गाडे आदी उपस्थित होते. दिव्यनगरी हा भाग जरी कोंडवे ग्रामपंचायतीमध्ये येत असला तरी कोंडवे ग्रामस्थांनीही काळजी घेणे गरजेचे आहे. पंचायतीकडून योग्य त्या उपाययोजना सुरूच आहेत. या पुढेही सुरू राहतील, असे आश्वासन सरपंच सौ. शोभा भुजबळ यांनी केले. बाधिताच्या संपर्कातील 3 जणांना होम क्वारन्टाइन करण्यात आले आहे. कोंडवे ग्रामस्थांनी सुरुवातीपासूनच अगदी व्यवस्थित काळजी घेत आतापर्यंत कोरोनाला लांबच ठेवले आहे. सर्वांनी योग्य ती काळजी घेतल्यास गावात कोरोनाचा प्रवेश होणारच नाही, असे उपसरपंच महेश गाडे यांनी सांगितले.