दैनिक स्थैर्य । दि.३१ जानेवारी २०२२ । सातारा । सातारा रहिमतपूर रस्त्यावर गोडोली परिसरात काही दिवसापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला गळती लागली होती। त्या गळतीचे काम ठेकेदाराकडून करण्यात आले होते मात्र रविवारी पुन्हा एकदा त्याच जलवाहिनीला गळती लागून लाखो लिटर पाणी वाया गेल्याने ठेकेदाराच्या कामाच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रविवारी दिवसभर गोडोली नाका हॉटेल चेतना पाण्याचे लोट रस्त्यावरून वाहत होते. साईबाबा मंदीर गोडोली नाका हॉटेल चेतना ते सामाजिक वनीकरण विभाग कार्यालय या दरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची सहा इंच व्यासाची मोठी पाईपलाईन जमिनीखालून घेण्यात आली आहे. कृष्णा उद्भवा कडून येणारे पाणी याच पाईप लाईन मधून आणण्यात येते. काही दिवसापूर्वी पाईपलाईनला गळती लागून सुमारे तीन मीटर उंचीचे पाण्याचे कारणे निर्माण झाले होते तेव्हाही लाखो लिटर पाणी वाया गेले.
प्रसारमाध्यमांनी आरडाओरडा केल्यानंतर ठेकेदाराने तात्काळ धावपळ करून हे कारंजे थांबवले. मात्र रविवारी दुपारी पुन्हा याच पाईपलाईनच्या कामाला ढिसाळ कारभाराची गळती लागली. पुन्हा एकदा पाण्याचे लोट रस्त्यावरुन वाहू लागले या संदर्भात काही नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता पल्लवी मोठे चौगुले यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नक्की ठेकेदाराने काय काम केले हा प्रश्न यांना पडला आहे. संबंधित नगरसेवक शेखर मोरे पाटील यांनी या प्रकरणासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.