जगातील अव्वल व्यापारी राष्ट्र होण्यासाठी उद्योग जगताने कृती आराखडा तयार करावा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१४ फेब्रुवारी २०२१ । मुंबई । देश स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत असताना देशातील उद्योग जगताने पुढील २५ वर्षात देशाला जगातील अव्वल व्यापारी राष्ट्र बनविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे व त्या दृष्टीने कृती आराखडा तयार करावा, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

एसएमई चेंबर ऑफ इंडीया आणि महाराष्ट्र औद्योगिक व आर्थिक विकास असोसिएशनच्या वतीने देण्यात येणारे ‘इंडीया एसएमई एक्सलन्स पुरस्कार’ तसेच ‘प्राइड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते रविवारी (दि. १३) राजभवन मुंबई येथे प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

देशाला ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्यासाठी तसेच निर्यातीसाठी ३ ट्रिलियन डॉलर्सचे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी उद्योग, लघु उद्योग, बँका तसेच वित्तीय संस्थांना महत्त्वाची भूमिका बजवावयाची आहे, असे सांगताना देशात तसेच राज्यात व्यापार सुलभीकरणासाठी (इज ऑफ डुईंग बिझनेस) उद्योजकांच्या सूचना असल्यास त्या अवश्य कराव्या असे राज्यपालांनी सांगितले.

कार्यक्रमाला त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील व एसएमई चेंबर आणि महाराष्ट्र औद्योगिक व आर्थिक विकास असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे उपस्थित होते.

कोरोना काळात मुंबईकरांना महापालिकेच्या वतीने उत्तम आरोग्य सुविधा दिल्याबद्दल मुंबईचे उपमहापौर सुहास वाडकर यांना ‘प्राईड ऑफ मुंबई’ पुरस्कार देण्यात आला.

मुंबई येथील फर्मेंटा बायोटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत नागरे यांना निर्यात क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल प्राइड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार देण्यात आला.

भूमी वर्ल्डचे संचालक प्रकाश पटेल, ठाकुर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्सचे जितेंद्र सिंह, बडवे इंजिनीअरिंग ग्रुपच्या संचालिका सुप्रिया बडवे, सूर्यदत्त शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ संजय चोरडिया, सर्वोत्तम इंडस्ट्रियल पार्कसाठी अनुप कुमार भार्गव व महिला उद्योजिका उत्कर्ष संग्राम पाटील आदींना ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार देण्यात आले.

टाटा टेली बिझनेसचे मुख्याधिकारी हरजीत सिंह, पियुष गुप्ता, अलसाल्ड्रो गिलीआनी, वर्धन तन्जोर राघवचारी, उदय अधिकारी, अर्पण मेहता, दिवीज तनेजा, एम फणीराज किरण, आनंद भंडारी, गौरव दुबे, सैयद अहमद,  समीर चाबुकस्वार व अनुपम जोशी यांना राज्यपालांच्या हस्ते ‘इंडिया एसएमई एक्सलन्स’ पुरस्कार देण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!