स्थैर्य, सातारा, दि. 15 : सातारा जिल्हा नेहमीच विविध क्षेत्रात आघाडीवर आहे. राज्यातच नव्हे तर देशातही नावलौकीक केला आहे. भौगोलिक दृष्टीने उद्योग क्षेत्राला, व्यवसायाला अतिशय पुरक असलेल्या या जिल्ह्यात उद्योग, व्यवसाय, सेवा उद्योग आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्राच्या वतीने १८ व १९ जून रोजी ऑनलाईन पद्धतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली होऊ घातलेल्या या मेळाव्याच्या निमित्ताने हा जिल्ह्यातील उद्योग-व्यवसायाचा लेखा-जोखा…..!!!
कोरोनामुळे जगभरामध्ये अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली. संपूर्ण जगासह भारतालाही याची झळ बसली. जानेवारी मध्ये भारतात पहिला रुग्ण आढळला आणि नंतर ही संख्या वाढतच गेली. यावरती खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन हा एकमेव उपाय असल्याचे अनेक तज्ञांनी सांगितले. या अपरिहार्यतेमुळे केंद्र शासनाला देशात लाॅकडाऊन जाहीर करावे लागला. रुग्ण संख्या वाढतच असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने देखील आग्रही भूमिका घेत लाॅकडाऊन वेळोवेळी वाढविले.
याचा सर्वात मोठा फटका बसला तो देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या उद्योगांना. देशासह राज्यातील लाखो उद्योग बंद झाले. जिल्ह्यातील देखील हजारो उद्योग बंद झाले. टाळेबंदी जाहीर होण्यापूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये मोठे, मध्यम आणि लघु स्वरुपाच्या नोंदणीकृत उद्योगांची संख्या २० हजार ४३२ इतकी होती. या उद्योगांमध्ये उत्पादक, सेवा पुरविणारे वा व्यावसायिक अशी सगळ्यांची नोंदणी असते. मात्र मार्च अखेर पर्यंत ही संख्या कमी होऊन केवळ अत्यावश्यक असलेले १८८ उद्योगच सुरु राहिले. लाखो मजुरांचे हाताचे काम गेले. जिल्ह्यात २० एप्रिल पर्यंत उद्योगांमधील केवळ ६ हजार ६०९ कर्मचारी कामावरती राहिले.
२० एप्रिल नंतर मात्र अर्थव्यवस्थेची घसरलेली गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने उद्योगांना मोठ्या प्रमाणावर मुभा दिली. त्याचसोबत काही योजना देखील जाहीर केल्या. उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी असेल किंवा कर्ज स्वरूपात लागणारी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे असेल. सरकारने या उद्योगांना सुरु करण्यासाठी तत्परतेने पावले टाकली. त्याचे सकारात्मक परिणाम देखील दिसून आले. एप्रिलच्या पंधरवड्यापर्यंत अवघ्या १८८ असलेल्या उद्योगांमध्ये २० एप्रिल आणि मे अखेर पर्यंत आणखी ८०० उद्योग पुन्हा सुरू झाले. त्याचबरोबर आणखी ७ हजार ७४५ कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले. असे जून उजाडेपर्यंत एकूण ९८८ उद्योगांनी पुनश्च हरी ओम म्हंटले. जवळपास १४ हजार ३५४ कर्मचारी पुन्हा आपल्या कामावर परतले. मात्र जिल्ह्यांतील उद्योग अद्यापही पूर्ण क्षमतेने चालू झालेले नाहीत. उद्योगांची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी स्थानिक युवकांना आणि उद्योजकांना आता पुढाकार घ्यावा लागणार आहे. तंत्रज्ञान, खाद्यनिर्मीती, शेती इत्यादीशी संबंधीत क्षेत्रातील आणखी उद्योग पुन्हा सुरू होणे गरजेचे आहे.
“लॉकडाऊनमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये अत्यावश्यक वगळून इतर उद्योग जवळपास बंद होते. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये उद्योग पुन्हा सुरु झाले. त्यानंतर आता जिल्ह्यातील औद्योगिक परिस्थिती पुर्वपदावर येताना दिसत आहे. मात्र मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. त्यामुळे स्थलांतरीत मजुरांच्या जाण्याने निर्माण झालेल्या जागांवर भुमिपुत्रांनाच संधी देणार आहे. त्यासाठी नोकरी मेळावा व भरती प्रक्रिया कार्यक्रम जिल्ह्यात सुरु होत आहे. तसेच उद्योजकांच्या इतर काही समस्या जाणून घेऊन त्यातून मार्ग काढण्यावर भर दिला जात आहे.” संदीप रोकडे, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, सातारा
“लॉकडाऊन चा कालावधी संपल्यानंतर वस्तू आणि सेवा यांच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सर्व उद्योजकांनी आपल्या अनुभवी, पूर्वीपासून कामावर असलेल्या कामगारांना कोणत्याही परिस्थितीत कामावरून कमी करू नये. कारण वस्तू आणि सेवांच्या मागणीत वाढ झाल्यानंतर उत्पादन वाढीचे लक्ष्य सर्वांना गाठावे लागणार. त्यावेळी आपल्या अनुभवी सैन्याची नितांत गरज उद्योजकांना पडणार आहे.
सर्व कामगार, नोकरी इच्छुक बेरोजगार उमेदवार यांनी कोणत्याही कामामध्ये कमीपणा बाळगू नये. स्थानिक पातळीवरील निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधींस प्रथम प्राधान्य द्यावे. परप्रांतीय कामगार, विस्थापित कामगार तात्काळ कामावर रुजू होतीलच असे नाही तरी त्यांच्या अनुपलब्धतेमुळे जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.”सचिन जाधव, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, सातारा.
जिल्ह्यात २५ मे अखेर श्रमिक एक्सप्रेसने परराज्यात १६ हजारच्या दरम्यान मजूर आणि कर्मचारी रवाना झाले आहेत. तसेच खाजगी बसेस, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसनेही शेकडो श्रमिक आपल्या राज्यात गेले. त्यामुळे यानिमीत्ताने उद्योग-धंद्यामध्ये निर्माण झालेली ही पोकळी पुन्हा भरून करण्यासाठी नव्या दमाच्या आणि नव्या संकल्पनेचा स्थानिक तरुणांची जिल्ह्यामध्ये मोठी गरज निर्माण झाली आहे. नवीन उद्योजकांनाही गुंतवणुकीसाठी आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी निमित्ताने एक संधी उपलब्ध झाली आहे. चला तर मग नव्या संधी शोधू, नोकरी, व्यवसाय, उद्योगासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करुया…. आणि संधीचे सोनं करु या…!!
जिल्हा माहिती कार्यालय, सातारा