उद्योग समूहांनी मूल्यांकनापेक्षा नीतीमूल्यांना अधिक महत्त्व द्यावे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ एप्रिल २०२२ । मुंबई । व्यवसायात उतरलेल्या कॉर्पोरेट्स, उद्योग समूहांनी अधिक लाभाचे उद्दिष्ट जरूर ठेवावे, परंतु उद्योगाच्या दीर्घकालीन विकास – विस्तारासाठी कंपनीच्या सकल मूल्यांकनापेक्षा शाश्वत नितीमूल्यांना अधिक महत्व द्यावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

राज्यपालांच्या हस्ते 2021 वर्षाचा  ‘इम्पॅक्ट पर्सन ऑफ द इअर’ हा पुरस्कार हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव मेहता यांना गुरुवारी (दि. 14) मुंबई येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. एक्स्चेंज फॉर मीडिया माध्यम समूहातर्फे ‘इम्पॅक्ट पर्सन ऑफ द इअर’ हा पुरस्कार देण्यात आला.

यावेळी एक्स्चेंज फॉर मीडियाचे संस्थापक व मुख्य संपादक अनुराग बत्रा, सहसंस्थापक नवल आहुजा, एमएक्स प्लेयरचे मुख्य अधिकारी निखिल गांधी, एबीपी न्यूजचे मुख्याधिकारी अविनाश पांडेय व उद्योग, माध्यम, जाहिरात व मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

देशाच्या व्यवसाय वाणिज्य इतिहासात अनेक उद्योग समूह आले आणि गेले. परंतु ज्या समूहांनी शाश्वत नीतिमूल्ये जपली तेच उद्योग प्रदीर्घ काळ टिकून आहेत. उद्योग समूहांनी नीतीमूल्ये जपली तर त्यांना यश तर मिळेलच परंतु समाजात देखील ते सकारात्मक प्रभाव पाडू शकतील असे राज्यपालांनी सांगितले.

हिंदुस्थान युनिलिव्हरच्या उत्पादनांनी विश्वासार्हता जपल्यामुळे त्यांची उत्पादने दशकानुदशके ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत असे राज्यपालांनी सांगितले. संजीव मेहता यांच्या काळात हिंदुस्थान लिव्हर संस्थेचे बाजारभांडवल 13 बिलियन डॉलर पासून  65 बिलियन डॉलर इतके झाल्याबद्दल त्यांनी मेहतांचे अभिनंदन केले.

देशासाठी चांगले तेच उद्योगासाठी चांगले

जे देशासाठी चांगले तेच आपल्या उद्योग समूहासाठी चांगले आहे असे आम्ही मानतो. कोविड काळात आपल्या उद्योगसमूहाने ऑक्सिजन काँसंट्रेटर्स उपलब्ध करून अनेक लोकांचे प्राण वाचवले, असे संजीव मेहता यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते ‘इम्पॅक्ट’ मासिकाच्या विशेष आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. अनुराग बत्रा यांनी प्रास्ताविक केले तर नवल आहुजा यांनी आभारप्रदर्शन केले.

योग गुरु बाबा रामदेव, स्टार समूहाचे उदय शंकर, राजन आनंदन, ‘बायजुज’चे बायजु रवींद्रन व आयटीसीचे संजीव पुरी यांना यापूर्वीचे ‘इम्पॅक्ट पर्सन ऑफ द इअर’ पुरस्कार देण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!