कोकणातील बागायतदारांना न्याय देण्यासाठी विशेष पॅकेजची मागणी करणार – उद्योगमंत्री उदय सामंत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २७ ऑगस्ट २०२२ । रत्नागिरी । गणेशोत्सवानंतर जिल्ह्यातील बागायतदारांच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठक आयोजित करुन कोकणातील बागायतदारांना न्याय देण्यासाठी विशेष पॅकेजची मागणी करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. आज जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अल्पबतच सभागृहात आंबा बागायतदारांच्या अडीअडचणींबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.

बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र विद्या कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी, तहसिलदार (महसूल) तेजस्विनी पाटील, पणन विभागाचे मिलींद जोशी, लीड बँकेचे मॅनेजर एन.डी. पाटील, जेष्ठ आंबा बागायतदार काका मुळे आदी उपस्थित होते.

यावेळी सामंत म्हणाले, आंबा बागायतदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेवून मार्ग काढू याकरीता सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. आंबा कॅनिंगचा हमीभाव ठरविण्यासाठी पणन विभाग, कृषि विद्यापीठ व आंबा बागायतदार यांनी चर्चा करावी. यावर्षीपासून कॅनिंग उद्योजकांनी स्थानिक आंबा व्यावसायिकांकडील आंबा कॅनिंगसाठी कमी पडला तरच बाहेरील राज्याकडून आंबा आयात करावा अशी सूचना कॅनिंग उद्योजकांना देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. काजू बोंडाना अल्कोहोल व वायनरीची मान्यता मिळण्याकरिता प्रयत्न करण्यात येईल. लांजा तालुक्यातील शेतकऱ्यांने काजू बी सोलण्याचे यंत्र विकसित केले असून त्याचा पेटंटही मिळाला आहे. हे यंत्र खरेदीसाठी सिंधुरत्न योजनेतंर्गत शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा प्रस्ताव मांडण्यात येईल असे मंत्रीमहोदयांनी सांगितले. आंबा पिकाच्या नुकसान भरपाईसाठी साठी देण्यात येणाऱ्या विमा व पिक कर्जाबाबत बँक, कृषि विभागाचे अधिकारी, जिल्हा उपनिबंधक यांच्याशी श्री. सामंत यांनी चर्चा केली.

यावेळी उपस्थित आंबा बागायतदारांनी आपल्या समस्या मंत्रीमहोदयांकडे मांडल्या. या समस्यांचे लवकरात लवकर निराकरण केले जाईल असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. बैठकीला आंबा बागायतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!