इंदूमिल : आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजनात मानापमान, ऐनवेळी सोहळाच रद्द; मित्रपक्षांच्या बहिष्काराच्या भीतीने सोहळा लांबणीवर


 

स्थैर्य, मुंबई, दि.१९: तीन पक्षांच्या सत्ताधारी महाराष्ट्र विकास आघाडीत शुक्रवारी जोरदार मानापमान नाट्य घडले. भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजनाचे निमंत्रण मर्यादित नेत्यांनाच, तेसुद्धा ऐनवेळी दिल्याने भूमिपूजनाचा सोहळा रद्द करून दिलगिरी व्यक्त करण्याची नामुष्की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ओढवली.

दादर येथील इंदू मिलच्या जागेवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारी भूमिपूजन होणार होते. कोविडमुळे त्याला अवघे १६ निमंत्रित होते. मात्र, काँग्रेसमधील ज्येष्ठ मंत्र्यांनी निमंत्रण नसल्याची नाराजी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली. तसेच राष्ट्रवादीलाही अंधारात ठेवले हाेते. उपमुख्यमंत्री अजित पवार व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना आमंत्रण होते. मात्र, त्यांना आदल्या रात्री उशिरा कार्यक्रमाची कल्पना दिली गेली. परिणामी राष्ट्रवादीतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

दुसऱ्यांदा भूमिपूजन:

सकाळी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांत चर्चा हाेऊन कार्यक्रमास न जाण्याचा निर्णय झाला. मित्रपक्षांच्या नेत्यांची गैरहजेरी दिसली असती तर शिवसेनेची पंचाईत झाली असती. म्हणून मुख्यमंत्री ठाकरेंनी सोहळा रद्द केला. २०१६ मध्ये पंतप्रधान मोदींनी याच स्मारकाचे भूमिपूजन केले होते. तरी पुतळ्याची उंची व स्मारक आराखड्यातील बदलाचे निमित्त साधून शिवसेनेने भूमिपूजनाचा घाट घातला.

१. आंबेडकर स्मारकाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पाहत आहे. हा विभाग नगरविकास विभागाच्या अखत्यारीत आहे. त्याचे मंत्री एकनाथ शिंदे आहेत.

२. स्मारकाचा सर्व खर्च सामाजिक न्याय विभाग करत आहे. हा विभाग धनंजय मुंडे यांच्याकडे आहे. मुंडे यांना अंधारात ठेवून सेनेचे एकनाथ शिंदे हा कार्यक्रम घडवून आणू पाहत होते.

३. स्मारकप्रकरणी पक्ष- संघटना असा भेदभाव नाही. सर्व आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून नंतर कार्यक्रम होईल, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी जारी केला.

४. राष्ट्रवादी व काँग्रेससाठी स्मारक कळीचा मुद्दा अाहे. शिवसेना भूमिपूजनाचे श्रेय लाटते आहे हे लक्षात येताच त्यांनी डाव उधळून लावला.

स्मारकाला विरोध, तेथे संशोधन केंद्र उभारा : आंबेडकर

डाॅ. आंबेडकर स्मारकाचा निधी वाडिया रुग्णालयास द्यावा. स्मारकाच्या जागी संशोधन केंद्र निर्माण करावे. मला भूमिपूजनाचे निमंत्रण नव्हते. एकट्या शिवसेनेचे सरकार असते तर कदाचित मला निमंत्रण असते. आपल्याला भूमिपूजनाच्या कार्यक्रमात रस नाही. – अॅड. प्रकाश आंबेडकर, डाॅ. आंबेडकरांचे नातू व वंचित आघाडीचे संस्थापक


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!