स्थैर्य, दि.१७: पूर्व लडाखमध्ये चिनी घुसखोरीच्या प्रयत्नांमुळे भारत आणि चीन यांच्यात तणाव कायम आहे. दरम्यान, भारतीय सैन्य तिथे बोफोर्स हॉवित्झर तोफांना तैनात करण्याची तयारी करत आहे. एएनआयने बुधवारी ही माहिती दिली. यानुसार, भारतीय सैन्यातील इंजीनियर बोफोर्स तोफांच्या सर्विसिंगचे काम करत आहेत. या तोफा काही दिवसात सीमेवर तैनात केल्या जातील.
बोफोर्स तोफांनी पाकिस्तानचे मोठे नुकसान केले होते
बोफोर्स तोफांना 1980 मध्ये भारतीय सैन्यात सामील केले होते. या तोफा लो आणि हाय अॅगलने फायरिंग करण्यास सक्षम आहेत. या तोफांनी भारताला युद्ध जिंकून दिले आहे. 1999 मध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या करगिल युद्धात या तोफांची मोठी मदत झाली होती. या तोफांनी उंच टेकड्यांवरील पाकिस्तानी बंकला सहज उडवले होते. यामुळे पाकिस्तानी सेनेचे मोठे नुकसान झाले होते.
चीनने 5 दिवसांत 3 वेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला
29-30 ऑगस्टच्या रात्री चीनी सैन्याने पँगोंग तलावाच्या दक्षिणेकडील टेकडी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, परंतू भारतीय सैनिकांनी त्यांचा हा डाव उधळून लावला. त्यानंतर, सैन्य अधिकार्यांमधील चर्चेची एक फेरी सुरू झाली, पण त्यानंतरच्या 4 दिवसांत चीनने पुन्हा दोन वेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला.
10 सप्टेंबर रोजी भारत-चीन परराष्ट्र मंत्र्यांनी मॉस्कोमध्ये सीमा विवाद शांततेत सोडविण्यासाठी बैठक घेतली. डिस-इंगेजमेंटसह 5 मुद्यांवर त्यावर सहमती दर्शविली. दरम्यान, चीन वारंवार वादग्रस्त भागात घुसण्याचा प्रयत्न करत आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही मंगळवारी संसदेत सांगितले की चीनने एलएसीवर सैन्य आणि दारुगोळा जमा केला आहे, परंतु भारतही त्यांना प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहे.