भारताच्या कोनेरू हम्पीने जिंकली महिलांची जागतिक जलद बुध्दिबळ ‘चॅम्पियनशिप’

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ३० डिसेंबर २०२४ | न्यूयॉर्क |
भारताची ३७ वर्षीय कोनेरू हम्पीने रविवारी इंडोनेशियाच्या इरेन सुकंदरचा पराभव करून दुसर्‍यांदा जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. यापूर्वी तिने २०१९ मध्ये जॉर्जियामध्ये ही स्पर्धा जिंकली होती. याशिवाय हम्पीने अनेक विक्रम केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे हम्पीचे अभिनंदन केले.

भारताची नंबर एकची महिला बुद्धिबळपटू हम्पी आता हे विजेतेपद एकापेक्षा जास्त वेळा जिंकणारी चीनच्या जू वेनजुन हिच्यानंतर दुसरी खेळाडू ठरली आहे. अशी कामगिरी करणारी ती भारतातील पहिली महिला बुद्धिबळपटू आहे. हम्पीने एकूण ११ पैकी ८.५ गुण मिळवले आणि यासह विजेतेपद पटकावले. तिचा शेवटचा सामना अनिर्णित राहिला असता किंवा ती पराभूत झाली असती तर विजेतेपदाचे तिचे स्वप्न अधुरेच राहिले असते. अशा स्थितीत हम्पीने दमदार खेळ दाखवत सामना आणि विजेतेपद पटकावले.

भारताच्या गुकेशने या महिन्यातच इतिहास रचला आहे. गुकेशने वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्येच इतिहास रचला होता. गुकेश १२ डिसेंबरलाच ‘वर्ल्ड चॅम्पियन’ झाला. त्याने गतविजेता आणि चिनी बुद्धिबळ मास्टर डिंग लिरेनचा पराभव केला होता. हे विजेतेपद पटकावून गुकेश विश्वनाथन आनंद यांच्यानंतर जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनणारा दुसरा भारतीय ठरला.


Back to top button
Don`t copy text!