स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१: कोरोना जागतिक साथीच्या काळात द्वीप राष्ट्रांना मदत करण्यासाठी 25 लाख कोटी डॉलर्स दिल्याबद्दल मालदीवने भारताचे आभार मानले आहेत. या साथीच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी भारतानं मालदीवची सर्वात मोठी आर्थिक मदत केली आहे. मालदीवचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या 75व्या अधिवेशनात सर्वसाधारण चर्चेदरम्यान सांगितले की, ‘या जागतिक साथीने जागतिक सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. मालदीवमधील आपले मित्र आणि द्विपक्षीय आणि बहुपक्षीय भागीदारांच्या सहकार्याशिवाय आम्हाला या संकटाचा सामना करणे शक्य झाले नसते. ’
शाहिद म्हणाले, ‘आम्ही आमच्या सर्व भागीदारांचे आभार मानतो, ज्यांनी अशा वेळी स्वत: आव्हानात्मक अवस्थेतून जात असताना आर्थिक सहाय्य, साहित्य आणि तांत्रिक सहाय्य केले. याचे उदाहरण म्हणजे भारत. नुकतीच भारताने 25 कोटी डॉलर्सची मदत दिली आहे, जी या जागतिक साथीच्या काळात कोणत्याही एका देशाने पुरवलेली सर्वात मोठी आर्थिक मदत आहे.’
कोरोना विषाणूवरची लस तयार झाल्यावर प्रत्येक व्यक्तीपर्यंत ती निश्चित पोहोचवली जाईल, अशी आशा मंत्र्यांनी व्यक्त केली. कोरोना साथीच्या अर्थव्यवस्थेच्या परिणामाचा सामना करण्यासाठी भारताने मालदीवला 25 कोटी डॉलर्सची आर्थिक मदत दिली असल्याचे मालदीवमधील भारतीय दूतावासाने निवेदनात म्हटले आहे. मालदीवचे अध्यक्ष अब्राहम मोहम्मद सोलिह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाच्या कठीण आर्थिक परिस्थितीला तोंड देण्यासाठी मदत करण्याची विनंती केल्यानंतर ही मदत देण्यात आली. ही आर्थिक मदत अत्यंत अनुकूल अटींवर पुरविली गेली.