दैनिक स्थैर्य | दि. १७ ऑगस्ट २०२३ | फलटण |
सरस्वती शिक्षण संस्था संचलित ‘प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज’मध्ये ७७ वा भारतीय स्वातंत्र्यदिन विविध देशभक्तीपर कार्यक्रमांनी उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
ध्वजारोहण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मेजर डॉ. मोहन घनवट यांच्या शुभ हस्ते व माजी प्राचार्य श्री. सुभाष देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार श्री. रमेश आढाव, डॉ. सागर माने, सहाय्यक नगररचनाकार श्री. ओमकार बाबर, व्यवस्थापकीय संचालिका सौ. संध्या गायकवाड, सौ.सुलोचना पवार, एकताचे संपादक श्री. ऋषीकेश आढाव व श्री. ऋषीकेश गायकवाड तसेच प्रशालेचे प्राचार्य, पर्यवेक्षिका व समन्वयिका यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते. दरम्यान, राष्ट्रगीत व ध्वजगीताचे गायन करण्यात आले. तत्पूर्वी प्रमुख पाहुणे व सर्व मान्यवरांचे स्वागत रोपे देऊन करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर प्रास्ताविक प्राचार्य श्री. अमित सस्ते यांनी केले. त्यानंतर प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी ‘हिंद देश का प्यारा झेंडा ’ व माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी ‘हे राष्ट्र देवतांचे’ या देशभक्तीपर समूह गीतांचे सुंदर गायन केले. तसेच विद्यार्थ्यांनी विविध स्वातंत्र्य सैनिकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान भाषणातून विशद केले. इ.१ ली च्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य सैनिकांसह थोर महापुरूषांच्या घोषवाक्यांचे उत्तम सादरीकरण करत सामाजिक प्रबोधनपर व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. पूर्व प्राथमिक विभागाच्या बालचमुंनी ‘सेव्ह बर्डस्, सेव्ह अर्थ’ ही अतिशय उत्कृष्ट नाटीका सादर करून सर्वांची मने जिंकत ‘पक्षी वाचवा’ची आर्त हाक दिली. त्यानंतर उच्च माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनह ‘इन्क्रेडिबल इंडिया’ ही हृदयस्पर्शी मूकनाटीका सादर केली. तसेच सीटीएफच्या विद्यार्थ्यांनी ‘स्टॅण्डिंग ड्रील’सह प्राथमिक विभागाच्या (इ.१ ली ते ५ वी ) विद्यार्थ्यांनी चित्तथरारक मानवी मनोर्यांचे सादरीकरण केले. त्याचबरोबर इ. ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यांवर लेझिमचे सर्वोत्तम सादरीकरण केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते वर्ष २०२२- २३ मधील वर्गनिहाय उत्कृष्ट विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह , १०० % उपस्थित विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुस्तके, इ.५ वी व ८ वी शिष्यवृतीस पात्र विद्यार्थी, इ.१० वी व १२ वी बोर्ड परीक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी, अॅबॅकस राज्यस्तरीय स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी यांचा पालकांसह सत्कार करण्यात आला.
मेजर डॉ. घनवट सरांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या व प्रशालेच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक करत शिक्षकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांना व पालकांनाही संबोधित केले. इतर उपस्थित मान्यवरांनीही विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कार्यक्रमांचे प्रचंड कौतुक केले. पालकांनीही उस्फूर्त प्रतिसाद दिला. सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी ‘मेरी माटी, मेरा देश’ या उपक्रमांतर्गत पंचप्रण शपथही घेतली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ. माधुरी माने, समन्वयिका सौ.सुवर्णा निकम व श्रीमती योगिता सस्ते यांच्यासह सर्व विभागाचे शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन श्री. ज्ञानेश्वर जाधव व आभार सौ. अमृता गोसावी यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम्’ने करण्यात आली.