दैनिक स्थैर्य | दि. 22 डिसेंबर 2023 | फलटण | विज्ञान प्रदर्शनासाठी येणारी मुले ही त्या शाळेतील टॉपर मुले असतात. त्यामुळे या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनासाठी आलेली मुले ही खूप हुशार असून भविष्यात या मुलांमधील अनेक मुले विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करतील; यामधील काही मुलांनी वैज्ञानिक देखील व्हावे. कारण जगामध्ये सर्वत्र तरुण मुलांची संख्या झपाट्याने कमी होतेय. मात्र या उलट भारतामध्ये तरुणांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे भारताकडे कुशल मनुष्यबळ असणार आहे व या कुशल मनुष्यबळाच्या जीवावर भारत हा जगातील सर्वात शक्तिशाली देश बनणार असल्यामुळे भविष्यात जग चालवण्याची जबाबदारी भारतावर असणार आहे; असे प्रतिपादन फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले.
सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती फलटण तसेच सरस्वती एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने गुणवरे येतील प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल येथे आयोजित केलेले 51 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उद्घाटन प्रसंगी प्रांताधिकारी ढोले बोलत होते. यावेळी गटशिक्षण अधिकारी अनिल संकपाळ, फलटण तालुका विस्तार अधिकारी मठपती, शिक्षण विस्तार अधिकारी दारासिंग निकाळजे, महात्मा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले, सरस्वती एज्युकेशन सोसायटीचे सचिव विशाल पवार, सरस्वती एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारी संचालिका सौ. प्रियांका पवार, फलटण तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, फलटण पंचायत समितीचे माजी सदस्य संजय कापसे, गुणवरे गावचे पोलीस पाटील अमोल आढाव यांच्यासह विविध मान्यवरांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पुढे प्रांताधिकारी ढोले म्हणाले की, भारताकडे कुशल मनुष्यबळ असल्यामुळे कारखाने परदेशी असतील मात्र त्यात काम करणारे इंजिनियर आपले असतील. दवाखाने जगातील असतील मात्र त्या ठिकाणी काम करणारे डॉक्टर्स आपले असतील, जगातील अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारे कुशल मनुष्यबळ हे भारताचे असणार आहे. योग्य वेळी योग्य घेतलेला निर्णय, त्यासाठी असणारे धाडस व लागणारी इच्छाशक्ती तिन्ही गुणांचा ज्यांच्यामध्ये संगम होतो तीच व्यक्ती यशस्वी होते. आणि नेमका याच तिन्ही गुणांचा संगम निल आर्मस्ट्रॉंग यांच्यामध्ये होता म्हणून चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारा कोण असे असा प्रश्न विचारला तर निल आर्मस्ट्रॉंगचे नाव येते. मात्र त्याचवेळी निल आर्मस्ट्रॉंग याच्याबरोबर दुसरी व्यक्ती देखील होती तिचे नाव “बज ऑलड्रिन” असे होते. पहिली जबाबदारी चंद्रावर उतरण्याची बज ऑलड्रीनवर होती. मात्र त्याने ते धाडस केले नाही नंतर निल आर्मस्ट्रॉंगला चंद्रावर उतरण्याची आदेश देण्यात आले; त्याने कोणताही विचार न करता नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर उतरला त्यामुळे त्याचे नाव लोकांच्या चिरकाल स्मरणात राहिले व भविष्यातही राहील.
याप्रसंगी बोलताना गटशिक्षणाधिकारी अनिल संकपाळ म्हणाले की विज्ञान प्रदर्शनामध्ये जवळपास 200 च्या दरम्यान प्राथमिक व माध्यमिक शाळांचा समावेश असून विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून मुलांच्या मध्ये जिज्ञासू वृत्ती तयार होते व अनेक मुलांना यामधून वेगळी प्रेरणा मिळून ती मुले भविष्यात खूप मोठे यश संपादन करू शकतात व विज्ञान प्रदर्शनातून छोटे छोटे मुलं भविष्यात वेगवेगळ्या क्षेत्रात प्रयोग करण्याचे धाडस दाखवितात असेही संकपाळ आपल्या भाषणांमध्ये म्हणाले. या ५१ व्या फलटण तालुका विज्ञान प्रदर्शनामध्ये जवळपास 200 शाळांनी सहभाग नोंदविला होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात सरस्वती एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारी संचालिका सौ. प्रियांका पवार यांनी सरस्वती एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल व संस्थेच्या कामकाजाची तसेच विज्ञान प्रदर्शन घेण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. शेवटी प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलची प्राचार्य यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.