स्थैर्य, दिल्ली, दि ९: देशात सध्या दररोज 70 ते 80 हजार कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. जर हाच वेग राहिला तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात भारत जगातील सर्वात जास्त संक्रमित असलेला देश बनेल. सध्याच्या रुग्णसंख्येनुसार 7 नोव्हेंबरपर्यंत देशात 91 लाख 70 हजार कोरोना रुग्ण असतील. अमेरिकेत दररोज 40 ते 45 हजार रुग्ण आढळून येत आहेत. यानुसार 7 नोव्हेंबरपर्यंत तेथे 91 लाख 40 हजार रुग्ण होतील.
भारतासाठी दिलासादायक गोष्ट म्हणजे दररोज वाढणाऱ्या केसेसमध्ये 30 ते 35 हजारांची घट झाली आहे. एकेकाळी दिवसाला 90 ते 97 हजार रुग्ण आढळून येत होते. आता ही संख्या कमी होऊन 70 ते 80 हजार झाली आहे. एवढेच नाही तर ऍक्टिव्ह रुग्णही मागील 2 आठवड्यांपासून कमी होत आहेत. 17 सप्टेंबरला देशात 10.17 लाख ऍक्टिव्ह रुग्ण होते, जे आता कमी होऊन 8.93 लाख झाले आहेत. मृत्युदरही कमी झाला आहे. मागील एक आठवड्यापासून एक हजारपेक्षा कमी मृत्यू होत आहेत. हासुद्धा देशासाठी एक चांगला संकेत आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या 69 लाख 3 हजार 812 झाली आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे यामधील 59 लाख 3 हजार 207 रुग्ण बरे झाले आहेत. 8 लाख 93 हजार 41 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मागील 22 दिवसात ऍक्टिव्ह केस कमी झाल्या आहेत. 17 सप्टेंबरला हा आकडा 10 लाख 17 हजारांपेक्षा जास्त होता. देशात आतापर्यंत 1 लाख 6 हजार 521 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.