“भारत विश्वगुरू होण्यास सज्ज” – अविनाश धर्माधिकारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, दि.२९: जगाला नैतिकतेचं, अध्यात्माचं – म्हणजे विश्वाच्या एकात्मतेचं मार्गदर्शन करणारा विश्वगुरू भारत हे जागतिक राजकारणातील भारताच्या सहभागाचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास माजी सनदी अधिकारी व लेखक-विचारवंत अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केला. 

सा. विवेकच्या ‘राममंदिर ते राष्ट्र मंदिर’ ग्रंथानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रजागरण व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२० रोजी सायं. ६ वाजता पार पडले. या प्रसंगी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी ‘जागतिक राजकारणात भविष्यातील भारताचे स्थान’ या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन केले. 

या वेळी धर्माधिकारी यांनी भारताची वाटचाल महासत्तेकडे कशी सुरू आहे, याविषयी विविध उदाहरणे देत आणि प्रसंगांचे कथन करत आपल्या मूळ विषयाकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, ‘‘संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिवेशनात प्रत्येक राष्ट्राच्या प्रमुखाला तीन मिनिटांत देशाची भूमिका मांडायची संधी दिली होती. तेथे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी तेरा मिनिटे बोलले. त्या वेळी सभागृह खच्चून भरलेले होते. मोदी यांनी सांस्कृतिक अंगाने आपली भूमिका मांडली. त्यांच्या भूमिकेचे त्या वेळी टाळ्यांच्या कडकडाटात आणि ‘स्टॅण्डिंग ओवेशन’ देऊन स्वागत झाले होते. जागतिक राजकारणात भारत काय स्थान मिळवतो आहे, ते या छोट्याशा प्रसंगाने व्यक्त झाले.”

पॅरिस करारामुळे भारताचे स्थान कसे उंचावले, याविषयी विवेचन करताना धर्माधिकारी म्हणाले, ‘‘संपूर्ण जगाला पर्यावरणाची समस्या भेडसावत होती. तेव्हा जागतिक तापमानवाढ दोन ते दीड डिग्रीच्या खाली ठेवायचे, असे पॅरिस करारात ठरले. संपूर्ण जगाने याला मान्यता दिली होती. भारताच्या सहभागामुळे हा करार करणे शक्य झाले, असे अमेरिकेचे त्या वेळचे राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांनी पत्रकारांशी बोलताना मान्य केले. भारताने या परिषदेत पर्यावरणाविषयी वैश्विक व्हिजनचे दर्शन घडवले होते. संपूर्ण जगाला सौर ऊर्जा वापरण्याचा सल्ला भारताने दिला. त्यासाठी कर्कवृत्त व मकरवृत्त यांच्यामधील १२२ देशांना एकत्र येण्यासाठी आग्रह धरला. आगामी काळात सौर ऊर्जेच्या माध्यमातून भारताच्या एकूण विजेच्या उत्पादनात वाढ करण्याचे ध्येय ठेवले. सौर ऊर्जेच्या उत्पादनासाठी जगाला १० बिलियन डॉलर्स देण्याचे भारताने धोरण ठेवले. येथूनच नव्या जगाची महासत्ता म्हणून भारताचा उदय झाला.’’

दुसरे महायुद्ध व शीतयुद्ध कालखंडात भारताचे अलिप्ततावादाचे धोरण होते. त्यानंतर झालेल्या बदलासंदर्भात विवेचन करताना धर्माधिकारी म्हणाले, ‘‘१९९१ साली सोव्हिएत रशियाचे महत्त्व कमी झाले आणि चीनसह बहुसंख्य साम्यवादी राष्ट्रांनी आपली धोरणे बदलली. तिथेपासून संपूर्ण जग एक ध्रुवीय बनले. २००८ साली जगावर आर्थिक संकट आले. अमेरिकेचे वर्चस्व कमी होत, महासत्ता म्हणून चीनचा उदय झाला. आज अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय करारांतून अमेरिका बाहेर पडली आहे. अशा अनिश्चितेच्या काळात भारतापुढे महासत्ता होण्याची मोठी संधी आहे.’’

“भारत आणि अमेरिका यांच्यातील आण्विक करारामुळे संपूर्ण जग भारताकडे नव्या आशेने पाहत आहे. आज भारतासमोर चीनचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी भारत-चीन संबंध, भारत-चीन स्पर्धा, भारत-चीन राजकीय नेतृत्व ही फार मोलीची गोष्ट ठरणार आहे. त्यासाठी भारताला दक्षिण अशियाई राष्ट्रांशी मैत्रिपूर्ण संबंध ठेवावे लागतील” असेही ते म्हणाले.

जागतिक राजकारणातील भारताचे स्थान, परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय करार, आव्हाने आदी महत्त्वाच्या मुुद्द्यांवर धर्माधिकारी यांनी विचार प्रकट केले.

उद्या, बुधवार दि. ३० सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी सहा वाजता ‘उद्यमशील भारतासाठी’ या विषयावर एबीएम नॉलेजवेअर लि. मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश राणे आणि दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे यांची व्याख्याने होणार आहेत. ही व्याख्याने सा. विवेकच्या फेसबुक पेजवरून व यूट्यूब चॅनलच्या https://www.facebook.com/VivekSaptahik/live https://youtu.be/GvbItWSUBNY या लिंकवर पाहता येतील.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!