
स्थैर्य, दि. ९: भारत-न्युझीलंड या संघात होणारी जागतिक कसोटी क्रिकेटची फायनल ही क्रिकेटची पंढरी लॉर्ड्स वर न होता साऊथम्पटनच्या रोझ बाऊल या मैदानावर होणार असल्याची घोषणा आयसीसीने केली आहे. या निर्णयाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुलीने दुजोरा दिला आहे. जागतिक कसोटीची क्रिकेटची ही १८ ते २२ जुन दरम्यान खेळवली जाणार आहे.
आधी जागतिक कसोटी क्रिकेटचा अंतिम सामना लॉर्ड्सवर घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, लॉर्ड्सचे मैदान आणि खेळाडू थांबलेले हॉटेल यांच्यात अंतर जास्त होते. त्यात सध्या कोरोना संसर्गाचा धोका कायम आहे. त्यामुळेच आयसीसीने सामन्याचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला. जागतिक कसोटी क्रिकेटच्या फायनल साठी साऊथम्पटन येथील मैदान अधिकच सोयीस्कर ठरणारे असल्याचे आयसीसीने सांगितले. येथील मैदान आणि हॉटेल यांच्यात अंतर जास्त नाही.
येथे खेळांडूना हॉटेलमधून थेट स्टेडियममध्ये प्रवेश करता येणे शक्य आहे. साऊथम्पटनच्या मैदानावर भारतीय संघाने दोन कसोटी सामने खेळला आहे आणि दोन्ही सामन्यात इंग्लंडविरुद्ध भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. न्यूझीलंड संघ मात्र प्रथमच या मैदानावर कसोटी सामना खेळणार आहे. त्यामुळे न्यूझीलंड संघाला या मैदानावरील पहिल्याच कसोटीत चांगली खेळी करावी लागणार आहे.