दैनिक स्थैर्य । दि. २८ नोव्हेंबर २०२१ । मुंबई । जागतिक हवामान बदल तसेच पर्यावरण रक्षणाच्या आव्हानाला समर्थपणे तोंड देण्यासाठी आधुनिक परिस्थितीला प्राचीन मूल्यांची जोड द्यावी लागेल, तसेच अहिंसा व विश्वशांती प्रस्थापित करण्यासाठी भारताला बलवान व सामर्थ्यवान बनवावे लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
अहिंसा विश्वभारती संस्थेतर्फे अध्यक्ष आचार्य डॉ लोकेश यांच्या षष्ठ्यब्दीपूर्ती निमित्त राजभवन येथे शनिवारी (दि. 27) ‘जागतिक आव्हाने व आपली जबाबदारी’ या विषयावर एका राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.
यावेळी जैन आचार्य सागरचंद्र सुरीश्वर महाराज, चित्रपट निर्माते व दिग्दर्शक मधुर भांडारकर व माजी आमदार राजपुरोहित उपस्थित होते.
भारतात त्याग भावनेला सर्वश्रेष्ठ मानले जाते. त्यामुळेच देशात संतांचा सर्वाधिक आदर केला जातो. महात्मा गांधी यांनी त्याग व शांतीपूर्ण सत्याग्रहातून स्वातंत्र्यासाठी लढा दिला. त्यागामुळे जीवन उन्नत होते, त्यामुळे संतांचे विचार धारण केले पाहिजे. मात्र त्यासोबतच जीवनात आत्मरक्षा, स्वसंरक्षणाची शक्ती असलीच पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.
जागतिक हवामान बदल, हिंसाचार तसेच गरिबी ही जगापुढील तीन मोठी आव्हाने असल्याचे नमूद करून अध्यात्म व ऐहिकवादात संतुलन प्रस्थापित केल्यास त्यातून निकोप समाज निर्मिती होईल असे प्रतिपादन आचार्य लोकेश मुनी यांनी यावेळी केले. जागतिक समस्यांच्या निराकरणासाठी केवळ शासनाने प्रयत्न करणे पुरेसे नाही तर त्यासाठी धार्मिक नेते व सामाजिक संस्थांना देखील पुढे यावे लागेल असे त्यांनी सांगितले. जल वायू प्रदूषणापेक्षाही समाजात वैचारिक प्रदूषण झाले असून त्यातून तिरस्कार व मतभेद वाढत आहेत. यादृष्टीने सहअस्तित्वाचा तसेच विचारांचा आदर करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
भारताने जगाकरिता अहिंसा गुरु व्हावे व सर्व जीवमात्रांना शांती व अभय लाभावे अशी अपेक्षा जैन आचार्य सागरचंद्र सुरीश्वर महाराज यांनी व्यक्त केली.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी जैन आचार्य सागरचंद्र सुरीश्वर महाराज यांना अहिंसा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मधुर भांडारकर, मधू जैन, डॉ गौतम भन्साळी व पत्रकार अभिमन्यू शितोळे यांना देखील यावेळी सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रस्तावित जागतिक शांती केंद्राच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.