स्थैर्य, नवी दिल्ली, दि. 21 : ट्रंप यांनी व्हाईट हाऊसबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं, “ही खूपच अवघड परिस्थिती आहे. आम्ही भारताशी चर्चा करत आहोत. तसंच चीनशीही बोलत आहोत. तिथं दोघांमध्ये मोठी समस्या निर्माण झाली आहे. दोघेही एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. आता पुढे काय होतंय, ते आम्ही पाहू. या दोन्ही देशांची मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करू.”
15-16 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत भारताच्या 20 जवानांचा मृत्यू झाला.
चीनचेही अनेक जवान जखमी असल्याचं वृत्त आहे, पण चीननं याविषयी अधिकृत आकडा जाहीर केलेला नाही.
भारत आणि चीनमधील तणावाची परिस्थिती पाहून गेल्या महिन्यात ट्रंप यांनी सोशल मीडियावर म्हटलं होतं की, ते भारत आणि चीन या दोन देशांमध्ये मध्यस्थी करायला तयार आहेत.
एका ट्वीटमध्ये ट्रंप यांनी म्हटलं होतं, “आम्ही भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांना सांगितलं आहे ती त्यांच्यातील सीमा वादात अमेरिका मध्यस्थी करायला तयार आहे.”
असं असलं तरी ट्रंप यांच्या मध्यस्थीच्या प्रस्तावाला भारत आणि चीन या दोन्ही देशांनी नकार दिला होता.
चीनबरोबरच्या तणावाच्या संबंधांमुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मूड खराब आहे, असंही ट्रंप यांनी म्हटलं होतं.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून भारताप्रती संवेदना व्यक्त
भारत आणि चीनदरम्यानच्या परिस्थितीवर अमेरिका लक्ष ठेवून आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी ट्वीट करत म्हटलं की, “चीनबरोबर झालेल्या चकमकीत भारताच्या जवानांना प्राण गमवावे लागेल, त्यामुळे भारताच्या लोकांप्रती आम्ही संवेदना व्यक्त करतो. तसंच या जवानांच्या कुटुंबीयांप्रतीही संवेदना व्यक्त करतो.”
एकीकडे भारत आणि चीन या दोन्ही देशात तणावाचं वातावरण असताना, दुसरीकडे अमेरिका चीनसोबत ताणल्या गेलेल्या संबंधांना शांत करण्याचाही प्रयत्न करतेय.
बुधवारीच हवाईमध्ये अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी चीनचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी यांग जिची यांच्यासोबत तब्बल सात तास बैठक घेतली. दोघेही डिनरला भेटले आणि सात तास दोन्ही देशांसंबधी चर्चा केली.
निरीक्षकांचं म्हणणं आहे की, सध्या परिस्थिती जरी योग्य नसली, तरी तणावपूर्व वातावरण नक्कीच कमी होईल आणि कुठलातरी मध्यममार्ग निघण्याची शक्यता आहे.अमेरिका आणि चीनमधील या बैठकीकडे याच दृष्टिकोनातून पाहिलं जातंय की, जरी या दोन देशातील संबंध चांगले नसले, तरी हा तणाव हे दोन्ही देश वाढवू इच्छित नाहीत.चीनने अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबतच्या बैठकीला ‘रचनात्मक बैठक’ म्हटलंय.
“हाँगकाँग, तैवान आणि शिन्जियांग या प्रकरणांमध्ये अमिरेकने हस्तक्षेप करू नये. कारण ही चीनची अंतर्गत प्रकरणं आहेत,” असं यांग यांनी अमेरिकेला सांगितलंय.
याच बैठकीत पोम्पिओ यांनी चीनला सांगितलं की, कोव्हिड-19 संबंधीची सर्व माहिती पारदर्शकपणे द्यावी.