स्थैर्य, दि.१६: एम.ए. चिदंबरम स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या बळावर इंग्लंडपुढं चांगलीच आव्हानं उभी राहिली आहेत. तिसऱ्या दिवसअखेर खेळ संपतेवेळी इंग्लंडची धावसंख्या 3 गडी बाद 53 धावा इतकी होती. त्यामुळं पाहुण्यांचा संघ काहीसा डगमगताना दिसला. चौथ्य़ा दिवशी भारताला विजयासाठी 7 गडी बाद करण्याची आवश्यकता आहे. दुसऱ्या खेळीमध्ये भारतीय क्रिकेट संघ 286 धावांवर सर्वबाद झाला. यावेळी संघानं इंग्लंपुढं एकूण 482 धावांचं लक्ष ठेवलं. या धावसंख्येचा पाठलाग करतेवेळी तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत डॅनियल ल़ॉरेंस 38 आणि कर्णधार जो रुट 2 धावांवर बिनबाद होते.
आता इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी 429 धावांची आवश्यकता आहे. शिवाय 7 विकेट हाताशी असल्यामुळं आता हा संघ नेमकी ही कामगिरी कशा प्रकारे पार पाडतो यावर क्रीडारसिकांचं लक्ष असेल. भारतानं दिलेल्या धावसंख्येचं आव्हान स्वीकारत मैदानात आलेल्या इंग्लंडच्या संघाकडून डोमिनीक सिब्लेला अक्षर पटेलनं माघारी धाडलं. त्यानंतर अश्विननं रोरी बर्न्सला विराट कोहलीच्या हाती झेलबाद करत माघारी पाठवलं.
अश्विनचं शतक
रविचंद्रन अश्विन या खेळाडूच्या शतकीय खेळीच्या बळावर भारतीय संघानं पाहुण्या इंग्लंडच्या संघापुढं तगडं आव्हान ठेवलं. अश्विननं आतापर्यंत एकाच कसोटी सामन्यात तिसऱ्यांदा पाच गडी बाद करत शतकीय खेळी केली आहे. भारतीय संघाच्या दुसऱ्या खेळीमध्ये त्यानं 148 चेंडूंमध्ये 14 चौकार आणि 1 षटकाराच्या बळावर 106 धावा केल्या. तर, विराट कोहलीनं 149 चेंडूंमध्ये 7 चौकारांच्या मदतीनं 62 धावा झळकावल्या. दोन्ही खेळाडूंमध्ये झालेल्या 96 धावांच्या भागीदारीमुळं इंग्लंडच्या संघापुढं चांगली धावसंख्या उभी करण्यात संघाला यश आलं.