स्थैर्य, नवी दिल्ली, दि.८: अमेरिकी अध्यक्षपदासाठी चार दिवसांपासून सुरू असलेला मत पेटीतील अखेर संघर्ष थांबला. जो बायडेन हेच अमेरिकेचे नवे अध्यक्ष होणार हे शनिवारी निश्चित झाले. डेमोक्रॅटिक उमेदवार बायडेन यांनी पेन्सिल्व्हेनिया व नेवाडामध्ये तगडे रिपब्लिकन प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निर्णायक आघाडी घेतली. विजयासाठी आवश्यक २७० पेक्षा ९ अधिक मते घेऊन बायडेन यांनी मुसंडी मारताच ट्रम्प यांना आता पुन्हा संधी नाही हे निश्चित झाले. अमेरिकेच्या निकालानंतर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विट करत, भारतालाही एता बायडनची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. आशा व्यक्त केली आहे.
दिग्विजय सिंह यांनी ट्विट करत अमेरिकेतील जनतेचे अभिनंदन केले. ‘बायडन यांची निवड केल्याबद्दल सर्व अमेरिकन मतदारांचे अभिनंदन. बायडन अमेरिकेतील जनतेला एकजुट करतील आणि आधीच्या अध्यक्षांप्रमाणे फूट पाडणार नाहीत,’ असे दिग्विजय सिंह म्हणाले.
‘आता भारतालाही एका बायडनची गरज आहे. 2024 मध्ये भारतालाही असा नेता मिळेल, अशी आशा करुया. राजकीय पक्षांशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक भारतीयाने यासाठी प्रयत्न करायला हवा. भारतातही फुट पाडणाऱ्या शक्तींचा पराभव करावा लागेल. आपण सर्वप्रथम भारतीय आहोत,’ असेही दिग्विजय सिंह म्हणाले.
मागील 28 वर्षांत प्रथमच यंदा अमेरिकेत विद्यमान राष्ट्राध्यक्षाला दुसऱ्यांदा कार्यकाळ मिळू शकलेला नाही. बायडेनपेक्षा त्यांच्या सहकारी कमला हॅरिस यांनी मोठा विक्रम आपल्या नावे प्रस्थापित केला असून अमेरिकेच्या इतिहासात त्या पहिल्या महिला उपाध्यक्ष असतील. कमला यांची आई मूळ तामिळनाडूची होती. दरम्यान, बायडेन अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष असतील. यापूर्वी 2009 ते 2017 दरम्यान बराक ओबामा यांच्या काळात ते उपाध्यक्ष होते. तीन दशके त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी जीव तोडून प्रयत्न केले होते.