स्थैर्य, नागठाणे, दि.२७: कराड उत्तर मतदार संघातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या नागठाणे (ता.सातारा) येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय डावपेचाना चांगलीच गती आली आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत जसजशी जवळ येत आहे तसतसे येथील पारंपारिक अजिंक्य ग्रामविकास पॅनल व चौंडेश्वरी ग्रामविकास पैनेलमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी वाढत असून या दोन्ही पैनेलमध्ये बंडखोरी वाढू लागली आहे. त्यामुळे या दोन्ही पॅनेलच्या पुढार्यांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.
नागठाणे ग्रामपंचायतीसाठी गावातील सहा वार्डमधून 17 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. यावेळच्या निवडणुकीत प्रत्येक वार्डमधून इच्छूकांची भली मोठी लिस्ट दोन्ही पॅनेलच्या नेत्यांकडे आली आहे. प्रत्येकजण स्वतःला उमेदवारी मिळावी यासाठी आपापल्या परीने शक्तिप्रदर्शनही करत आहेत. यामध्ये नवीन इच्छूकांसह माजी पदाधिकार्यांचाही समावेश आहे.
अद्यापही दोन्ही पैनेलकडून उमेदवारांची अंतिम यादी तयार झाली नाही. वाढत्या इच्छूकांमुळे पक्षश्रेष्ठींपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. उमेदवारीच्या रेसमधून कोणीही माघार घ्यायच्या तयारीत नसल्याने चांगलाच घनशाघोळ झाला आहे. जवळपास सर्वच वार्डमधील इच्छूक ‘जर पॅनेलने उमेदवारी दिली नाही तर अपक्ष लढणारच’ असा शड्डू ठोकला आहे. त्यामुळे येथील दोन्ही पॅनेलाला बंडखोरीचे ग्रहण लागले असून ही संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी दोन्ही पॅनेलच्या पक्षश्रेष्ठींना आटोकाट प्रयत्न करावे लागणार असून ही पॅनेलअंतर्गत बंडखोरी रोखण्यात या पुढार्यांना कितपत यश येणार? हे येणार्या काही दिवसांत समजणार आहे.