दैनिक स्थैर्य । दि.२४ मार्च २०२२ । मुंबई । सातारा जिल्ह्यातील सायगाव (एकंबे) येथील प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात आलेल्या भूखंडाचे एक महिन्याच्या आत स्वतंत्र ७/१२ करुन कब्जापट्टी देण्यात येणार असल्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य महेश शिंदे यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले की, सायगाव (एकबे) येथे कण्हेर प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले असून त्यांना निवासी भूखंड वाटप करण्यात आलेले आहेत. या गावठाणातील भूखंडांचे स्वतंत्र ७/१२ उपलब्ध नसल्यामुळे ते ७/१२ करण्याची कार्यवाही सुरु केली आहे, त्यासाठी मोजणीचे पैसे भरले असून कब्जेपट्टी देण्याकरिता शासनाकडून २० टक्के विलंब शुल्क आकारण्यात येणार नसल्याचेही मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी सांगितले. एक महिन्याच्या आत या प्रकल्पग्रस्तांचा स्वतंत्र ७/१२ तयार न झाल्यास त्याची चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.