
स्थैर्य, गोखळी, दि. १५ ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त गोखळी (ता. फलटण) गावात विविध शासकीय आणि सहकारी संस्थांमध्ये उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात, इयत्ता दहावीत प्रथम आलेल्या विद्यार्थिनीच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण करून एक वेगळा आदर्श निर्माण करण्यात आला.
यासोबतच, ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत अधिकारी गुरव , प्राथमिक शाळेत शाला व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतिश गावडे , गोखळी विकास सोसायटीत उपाध्यक्ष पोपट गावडे , जिल्हा बँकेत सोमनाथ गावडे , हनुमान विकास सोसायटीत चेअरमन विश्वास गावडे आणि आरोग्य उपकेंद्रात पोलीस पाटील विकास शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
हनुमान विद्यालयाच्या प्रांगणात गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी इयत्ता १० वी आणि १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना माजी उपसरपंच अभिजित जगताप यांच्या वतीने रोख बक्षिसे व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी यावेळी राष्ट्रभक्तीपर गीते सादर केली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक डॉ. राधेश्याम गावडे होते. कार्यक्रमास माजी सरपंच बजरंग गावडे, मठाधिपती ओंकार गिरी महाराज, वैद्यकीय अधिकारी डॉ. सानिया शेख यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधेश्याम जाधव व किरण पवार यांनी केले, तर आभार प्रवीण निंबाळकर यांनी मानले.