प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात; पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश


स्थैर्य, कोळकी, दि. १६ ऑगस्ट : “पर्यावरण वाचले तरच आपण वाचू,” असा मोलाचा संदेश मुधोजी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, प्रा. सुधीर इंगळे यांनी दिला. सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोळकी येथे ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रदिप माने, कोषाध्यक्षा सविता माने, संचालिका संध्या गायकवाड, तालुका क्रीडा अधिकारी महेश खुटाळे, योगा प्रशिक्षक विद्या शिंदे, पत्रकार योगेश फडतरे, सतिश कर्वे, मुकेश नाळे, ऋषिकेश गायकवाड, प्रथमेश गायकवाड, प्राचार्या सुजाता गायकवाड आणि पर्यवेक्षक महेंद्र कातुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कवायती, देशभक्तीपर गीते आणि नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. ‘उरी’ हल्ल्यातील शहिदांना मानवंदना देणाऱ्या विशेष कार्यक्रमाने वातावरण भारावून गेले होते. तसेच, चिमुकल्यांनी स्वातंत्र्यवीरांची माहिती सांगितली.

यावेळी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तालुका क्रीडा अधिकारी महेश खुटाळे यांनी विद्यार्थ्यांना हॉकी स्टिक व बॉल्स भेट दिले. तसेच, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी संस्थेच्या वतीने ‘सकाळ NIE’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जागृती गुप्ता व सँडिन्या घाडगे यांनी केले. या कार्यक्रमास पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!