
स्थैर्य, फलटण, दि. १५ ऑगस्ट : भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन फलटण नगरपरिषदेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या हस्ते सकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत आणि राज्यगीताने परिसर दुमदुमून गेला.
याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी स्वातंत्र्यलढ्यातील महापुरुषांचे स्मरण करून त्यांच्या आदर्शांचे पालन करण्याचे आवाहन केले. देशाची एकता आणि अखंडता अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असे ते म्हणाले.
ध्वजारोहणानंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच, शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते आणि भाषणे सादर केली. विशेष म्हणजे, नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वर आधारित एक नाटक सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाला शहरातील नागरिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, पत्रकार, शिक्षक, विद्यार्थी आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.