
स्थैर्य, फलटण, दि. 17 ऑगस्ट : आयडियल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन अभूतपूर्व जल्लोषात, शिस्तबद्ध वातावरणात आणि उत्कट देशभक्तीच्या भावनेने साजरा करण्यात आला. ‘ऑपरेशन सिंदूर’ या भावपूर्ण नृत्यनाट्याने आणि विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध संचलनाने हा सोहळा विशेष संस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, शाळेचे डायरेक्टर शिवराज भोईटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व झेंडा गीताने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मार्च पास्ट, कवायती आणि लाठीकाठीच्या प्रात्यक्षिकांमधून त्यांची शिस्त आणि एकता दिसून आली. सहावी व सातवीच्या मुलींनी सादर केलेल्या ‘वंदे भारतम्’ या गीताने उपस्थितांना भारावून टाकले, तर ‘ऑपरेशन सिंदूर’ या नृत्यनाट्यातून पहेलगाम हल्ल्यातील शौर्यगाथा जिवंत करत सैनिकांच्या बलिदानाला मानवंदना देण्यात आली.
या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये राज्य व राष्ट्रीय धावण्याच्या स्पर्धेत पदके मिळवणारा अंशुमन संतोष सुळ, शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवणारी अंकिता कल्याण भोसले आणि हिंदी विषयात सर्वाधिक गुण मिळवून देणाऱ्या शिक्षिका स्मिता पवार यांचा सत्कार करण्यात आला.
देशासाठी सजग आणि जबाबदार नागरिक घडवणे हेच शाळेचे ध्येय असल्याचे प्रमुख पाहुणे शिवराज भोईटे यांनी आपल्या मनोगतात सांगितले. त्यांनी संस्थापिका डॉ. वैशाली शिंदे यांच्या दूरदृष्टीमुळे शाळेत विविध उपक्रमांना मिळणाऱ्या प्रोत्साहनाचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला डायरेक्टर मयूर भोईटे, मंदार पाटसकर, श्रद्धा शहा, संस्थापिका डॉ. वैशाली शिंदे, उपमुख्याध्यापिका सोफिया तांबोळी, सेंटर हेड सुचिता जाधव व पूजा बाबर उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन संस्थापिका डॉ. वैशाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. सूत्रसंचालन सुचिता जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन विद्यार्थी शर्व शिवराज भोईटे याने केले.