
स्थैर्य, फलटण, दि. १६ ऑगस्ट : ईश्वरकृपा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, गुणवरे येथील ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी संभाजी गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध कवायती, लेझीम डान्स, झांजपथक आणि देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. ‘उरी’ हल्ल्यातील शहिदांना मानवंदना देणाऱ्या विशेष कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. तसेच, विद्यार्थ्यांनी सामाजिक, शैक्षणिक, कृषी अशा विविध विषयांवर भाषणे करून आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ईश्वर गावडे होते. त्यांनी, तसेच संस्थेच्या सचिव साधना गावडे आणि प्रमुख पाहुणे संभाजी गावडे यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी सिद्धी आटोळे व दिया मिंड यांनी केले, तर आभार प्रदर्शन दिया मिंड हिने केले. कार्यक्रमास पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.