स्थैर्य,दि. ०२: येथील ग्रामपंचायत सदस्य सागर जगदाळे यांनी औंध गावातील केदारेश्वर चौकालगत असणारा नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणारा बंधारा हटविण्यासाठी बेमुदत उपोषण मागील दोन दिवसांपासून येथील मारुती मंदिरात सुरू केले आहे. जगदाळे यांना पाठिंबा देण्यासाठी महिलांनीही चक्रीय उपोषण सुरू केले आहे.
दोन हजार चौदा साली औंध येथील केदारचौका लगत असणाऱ्या ओढयामध्ये सिमेंट बंधारा बांधण्यात आला. त्यानंतर या बंधाऱ्यातील पाणी साठप्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. याठिकाणी परिसरातील येणारे सांडपाणी,गावातील गटारातील पाणी, शौचालयांचे पाणी यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. कावीळ,गँस्टो या सारख्या आजारांना ही त्या परिसरातील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
याबाबत वेळोवेळी शासनाकडे ,संबंधित विभागाकडे,जिल्हाधिकारी यांच्या कडे पाठपुरावा करून ही हा बंधारा काढून टाकण्याबाबत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने तसेच मागील एक महिन्यापूर्वी सर्व विभागांना कळवून ही लक्ष न दिल्याने सोमवारी सकाळी केदार चोक परिसरातील ग्रामस्थ व महिलांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्य सागर जगदाळे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. याबाबत ठोस कार्यवाही होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच ठेवणार असल्याची माहिती जगदाळे यांनी दिली.
दरम्यान जगदाळे यांना औंध येथील आजी माजी सैनिक संघटनेचे धनाजी आमले, जयसिंग घार्गे तसेच आलिम मोदी, वसंत गोसावी, चंद्रकांत पवार, गणेश चव्हाण, संदिप इंगळे, सोमनाथ देशमुख ,पोलीस पाटील वसंत जानकर यांनी ही आंदोलन स्थळी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.