स्थैर्य, नंदुरबार, दि.२८: अक्कलकुवा, धडगाव आणि नवापूर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. साकलीउमर येथे झालेल्या शिबिरात 294 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले तर देवळीपाडा येथे झालेल्या शिबिरात 460 नागरिकांनी लसीची पहिली मात्रा घेतली.
नवापूर तालुक्यातील देवळीपाडा येथे वागदी आणि चितवी गावातील नागरिकांनादेखील स्कूल बसच्या मदतीने आणण्यात आले. तहसिलदार मंदार कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या तिन्ही गावात शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली होती. देवळीपाडा येथील सुदाम चौधरी, वागदीचे भालचंद्र निकम, चितवीचे प्रदीप राजपूत, केशवफळीचे तापीराम अहिरे आणि निमदर्डे येथील एफ. एम. पिंजारी आणि बाबुराव वसावे यांनी शिबिराच्या नियोजनात सहकार्य केले.
डॉ.अविनाश मावची आणि पास्टर बाळुदादा यांनी नागरिकाना लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगितले. गावातील तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्तींनीदेखील नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित केले. पिंपराण आणि मोहनपाडा येथे लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी नागरिकांसोबत संवाद साधण्यात आला.
अक्कलकुवा तालुक्यातील साकलीउमर येथे माजी सभापती बिज्यादादा वसावे यांनी सर्वप्रथम लसीकरण करून घेतले आणि इतरांनाही लसीकरणासाठी आवाहन केले. गावात शिबिराच्या आयोजनासाठी बैठकीच्या माध्यमातून नागरिकांच्या मनातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सरी, जुनवणी आणि साकलीउमर येथील प्रत्येक पाड्यावर स्थानिक भाषेत लसीकरणाविषयी माहिती देण्यात आली. तलाठी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती यांच्यामार्फत लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या.
मोबाईल नेटवर्कसाठी शिबिरस्थळी नोंदणी झाल्यानंतर 6 किलोमीटर अंतरावर ऑनलाईन नोंदणीची सुविधा करण्यात आली. शिबिरस्थळी नागरिकांना आणण्यासाठी वाहनाची सुविधा करण्यात आली होती. लसीकरण झाल्यानंतर नागरिकांना बिस्कीटाचे पुडे देण्यात आले, तसेच भोजनाची सुविधादेखील करण्यात आली होती. शिबिर यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वेलीचे वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी, युनिसेफ कर्मचारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, परिचर, शिक्षकवर्ग, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती आदींचे सहकार्य मिळाले.
धडगाव तालुक्यातील काकरदा येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात 91 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. दुर्गम भागात नागरिकांचा लसीकरणाला प्रतिसाद वाढत असून गावातील लोकप्रतिनिधीदेखील लसीकरणासाठी पुढाकार घेत आहेत. तहसिलदार ज्ञानेश्वर सपकाळ गटविकास अधिकारी सी.टी.गोस्वामी आणि गट शिक्षणाधिकारी जयंत चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विविध ठिकाणी नागरिकांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे.