
दैनिक स्थैर्य । 24 जुलै 2025 । सातारा । पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सातारा जिल्ह्यातील तापोळा, बामणोली आणि पावशेवाडी परिसरातील ग्रामस्थ सध्या एका गंभीर समस्येला सामोरे जात आहेत. कोयना धरणाच्या बॅकवॉटर परिसरात झाडांवर व गावात लाखोंच्या संख्येने वटवाघळे (बॅट्स) वाढल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. या वटवाघळांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून वाहनांचे आणि सार्वजनिक ठिकाणांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.तापोळा आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या या भागात नागरिकांनी वटवाघळांच्या त्रासाविरोधात आरोग्य विभाग व तहसीलदार कार्यालयाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. संपूर्ण प्रशासन परिसरात असूनही आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे हा परिसर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रभावक्षेत्रात येतो. त्यामुळे नागरिकांनी यासंबंधी थेट उपमुख्यमंत्र्यांकडेच मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे साहेबांनी प्रशासनाला योग्य त्या सूचनांद्वारे हस्तक्षेप केल्यास आम्हाला यासमस्येपासून दिलासा मिळू शकतो, अशी आशा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. या परिसरात वटवाघळांमुळे निर्माण झालेल्या घाणीमुळे रोगराईचा मोठा धोका निर्माण झाला आहे. वटवाघळांची विष्ठा झाडांखाली आणि रस्त्यावर पडल्याने परिसरात दुर्गंधी पसरते. यामुळे पर्यटक येथे थांबण्यास टाळाटाळ करत आहेत, परिणामी स्थानिक पर्यटन व्यवसायावरही मोठा परिणाम झाला आहे.
वटवाघळांमुळे गावातील पाळीव प्राणी, विशेषत: गुरे-ढोरे यांच्यावर गोचडी निर्माण होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच, माणसांनाही या. विष्ठेमुळे त्वचारोग, सर्दी खोकल्यासारख्या त्रासांचा सामना करावा लागत आहे.गेल्या काही वर्षांपासून वटवाघळांची संख्या झपाट्याने वाढत आहे. स्थानिक नागरिकांनी काही तात्पुरते उपाय केले, मात्र त्याला यश मिळाले नाही. त्यामुळे या समस्येचा शास्त्रीय व शाश्वत उपाय शोधून तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.हे केवळ पर्यावरणीय नव्हे तर आरोग्य व आर्थिक प्रश्न आहे. सरकारने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी राज्य प्रशासनाकडे केली आहे.