
मुलाखतीच्या सुरुवातीलाच श्रीमंत रामराजे म्हणाले की, आज जे मी बोलणार आहे, ते माझ्यावर होणार्या टीकेला फाइनल उत्तर असणार आहे. आज मी अभिमानाने सांगतो की, मी पाणी तर घालवले नाहीच, पण कृष्णेचे ८१ टीएमसी पाणी पश्चिम महाराष्ट्रासाठी वाढवून घेतले आहे. हे माझ्या ३० वर्षांच्या राजकारणाचे फलित आहे. मी जर पहिले काय केले असेल तर ते प्रथम मी फलटणचे इंजिनिअर कुलकर्णी साहेब यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याकडून ‘लवाद’ काय चीज आहे, ते समजून घेतले. विरोधकांकडून मी ३० वर्षे जे काम केलेले आहे, तेच खोडून काढायचे काम चालले आहे. त्यामुळे साहजिकच मला त्रास होत आहे. स्वातंत्र्यानंतर सांगोल्याला पहिले पाणी आणून त्याचे पूजन प्रथम मी केले आहे आणि विरोधक माझे पुतळे तेथे जाळत आहेत. सांगोल्याचे आमदार शहाजीबापूंचा इरिगेशनशी संबंध थोडा कमीच असतो, पाण्याचा संबंध असू शकतो. विरोधकांना वैयक्तिक भीती एकच वाटते की, उद्या जर मी माढा मतदारसंघातून लोकसभेला उभा राहिलो तर काय होईल? मोदी साहेबांचे आणि माझे काही वाद झाले होते, ते मला सांगायचे नाहीत; परंतु मला माणसे कधी दुखवायची, हे चांगले माहीत आहे. मी तुमच्यासमोर बसलेलो आहे, तो मी राजकारणी रामराजे म्हणून नाही. राजकीय रामराजे बघायचे असतील तर तुम्ही फलटणला निवडणुकीच्या अगोदर सहा महिने या!
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी ‘बोल भिडू’ या ‘यू ट्युब’ चॅनलला नुकतीच आपली मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आपल्या ३० वर्षांच्या राजकारणाचा लेखा-जोखा मांडला. या मुलाखतीत त्यांनी आपण फक्त आजवर पाण्यासाठीच राजकारण केल्याचे सांगितले. आपले विरोधक आपल्यावर आज जे आरोप करीत आहेत, ते फक्त स्वार्थासाठीच करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी पट्ट्यात आज जे बागायत क्षेत्र म्हणजे उसाचे मोठ्या प्रमाणावर घेतले जाणारे पीक व या पट्ट्यात चालणारे चार साखर कारखाने हे मी आणलेल्या पाण्यामुळेच उभे राहिले आहेत, असे ठासून सांगितले. त्यांच्या मुलाखतीचा घेतलेला आढावा.