स्थैर्य, वडूज (सुयोग्य लंगडे) : सातेवाडी-वडूज शहराच्या हद्दीवर मुंबई येथून आलेल्या 75 वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने सातेवाडी व वडूज शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर गुरसाळे गावठाण ता. खटाव येथील मुंबई येथून आलेल्या 75 वर्षीय पुरुषाचा घरी मृत्यू झाला होता. या पुरुष हा मृत्यू पश्चात रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर परिसरात खळबळ माजली.
सातेवाडी-वडूज हद्दीवर ता. खटाव येथे मुंबई येथून एकूण चार जण आले होते. मुंबई वरून येतानाच शिरवळ येथे त्या चौघांचे स्वब घेण्यात आले होते. त्यातील 75 वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाने त्या महिलेस सातारा येथे जिल्ह्यारुग्णालयात पाठविण्यात आले. तर त्याच्या बरोबर आलेले तीन जण ज्या घरात होम कॉरनटाईन होते त्या घरातील दोन महिला अशी एकूण पाच जणांना मायणी येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. यामुळे सातेवाडी व वडूज मधील काही भाग प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केले असून वडूज मधील तात्काळ सर्व बाजारपेठ बंद करण्यात आली असून प्रशासनाने योग्य त्या सूचना दिल्या आहे. आरोग्याच्या खबरदारीच्या सर्व उपाय योजना राबविल्या जात आहे.
त्याच प्रमाणे गुरसाळे ता. खटाव येथील मुंबई येथून पंधरा दिवसांपूर्वी एक कुटूंब आले होते. या कुटूंबाने होम कॉरनटाईन व इतर प्रक्रिया पूर्ण केल्या होत्या. या कुटूंबातील 75 वर्षीय वृद्धास बुधवार दुपार पासून त्रास होऊ लागला. त्याच्यावर स्थानिक प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून सातारा येथील शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र कुटूंबियांनी रुग्णाची एकंदरित परिस्थीती पाहून घरी ठेवण्याचा निर्णय घेतला. त्या रुग्णास पक्षाघात व अन्य आजार ही होते. त्यातच त्यांचा घरीच मृत्यू झाला. मृत्यू पश्चात त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कात असणाऱ्या सात जणांना मायणी येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे गुरसाळे गाव सील करण्यात आले असून प्रशासनाने तातडीने भेट देत योग्य त्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान सातेवाडी-वडूज हद्दीत व गुरसाळे येथे प्रांताधिकारी अश्विनी झिरंगे, उपविभागीय पोलीस अधिकारी बी. बी. महामुनी, तहसीलदार डॉ. अर्चना पाटील, गटविकास अधिकारी रमेश काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख, पोलीस निरीक्षक अशोक पाटील, व वैद्यकीय कर्मचारी यांनी भेट तात्काळ भेट देऊन गावातील बाधित भागासह सर्व रस्ते सील केले आहेत. तसेच आरोग्य विभागाकडून घर टू घर सर्वेक्षण करून बाहेरून आलेल्या लोकांची माहिती संकलित करण्यात येत आहे.