
सोलापूर विद्यापीठातर्फे ‘संस्कृत’ विषयावर चर्चासत्र संपन्न
स्थैर्य, सोलापूर, दि. ०४ : संस्कृत ही सर्व भाषांची जननी असून संस्कृतचा इतिहास फार मोठा आहे. संस्कृतमधूनच इतर भाषांची उत्पत्ती झालेली असून देशाला जोडणारी ही महान भाषा आहे. श्लोक, सुभाषित, संगीताचा संस्कृतवर दांडगा प्रभाव असून याचा व्यवहारात वापर वाढवा, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या भाषा आणि वांग्मय संकुलातील संस्कृत विभागाच्यावतीने ‘संस्कृत : भाषा जननी भूतकाळ व वर्तमान संदर्भ’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय वेबिनारचे उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी भाषा व वांगमय संकुलाचे प्रभारी संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, मातृभाषा ही महत्त्वाची असून त्याबरोबरच संस्कृतचे अध्ययन करणे, व्यवहारात संस्कृतीचा अधिकाधिक वापर करणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. जगातील इतर भाषांच्या तुलनेने संस्कृत भाषा फार जुनी आहे आणि ती महान आहे. संस्कृतमध्ये अलंकार, श्लोक, सुभाषित आणि संगीत मोठ्या प्रमाणात असून त्याचा आताच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे आवश्यक आहे. अलीकडे राजकारणात देखील काही वेळा संस्कृतीचा वापर केला जातो, मात्र युवा राज्यकर्त्यांनीदेखील प्रभावीपणे संस्कृतचा वापर करावा असे सांगून राज्यपाल कोश्यारी यांनी संशोधनासाठी संस्कृतचा अभ्यासक व विद्यार्थ्यांनी उपयोग करून घ्यावा, असे आवाहन केले.
कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये गत दोन वर्षांपासून भाषा संकुल सुरू करून आठ भाषेचे अध्ययन, संशोधन, पदव्युत्तर पदवीचे शिक्षण चालू करण्यात आले आहे. सोलापूर ही बहुवैविध्य, बहुभाषिकांची नगरी असून यामुळे येथे कन्नड, तेलुगू, पाली, संस्कृत भाषेचेही शिक्षण सुरू करण्यात आले आहे. संस्कृत ही भाषा विकास आणि समन्वयाचे एक माध्यम असून व्यवहारात संस्कृतचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. संस्कृतचा सर्वांनी वापर करावा, असेही त्या यावेळी म्हणाल्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी ही संस्कृतचा वापर करत असत आणि त्यासंदर्भात ग्रंथसंपदाही उपलब्ध असल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
या वेबिनारमध्ये कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेकचे कुलगुरू प्रा. डॉ. श्रीनिवास वरखेडी व डेक्कन अभिमत विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रसाद जोशी संस्कृत विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली व श्रुती देवळे यांनी केले. आभार ओमप्रकाश बरबडे यांनी मानले.