सांख्यिकी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवा – अपर मुख्य सचिव नितिन गद्रे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २९ जून २०२२ । मुंबई । सर्व क्षेत्रात सांख्यिकी अपरिहार्य आहे. राज्यासाठी विविध योजना तयार करताना सांख्यिकीचा महत्त्वपूर्ण उपयोग होतो. शाश्वत विकासासाठी सांख्यिकी संकल्पनेस अनुसरून अचूक, विश्वासार्ह, वेळेत आकडेवारी प्राप्त होणे गरजेचे आहे. यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे मत नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी व्यक्त केले.

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने राष्ट्रीय सांख्यिकी दिनानिमित्त मंत्रालयात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास खादी व ग्रामोद्योग विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंशु सिन्हा, कामगार आयुक्त सुरेश जाधव, संचालनालयाच्या उपमहानिदेशक सुप्रिया रॉय, संचालक विजय अहेर यांसह विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

श्री. नितिन गद्रे म्हणाले, भारतीय संख्याशास्त्राचे जनक सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रशांत चंद्र महालनोबिस यांचे संख्याशास्त्राच्या विकासातील योगदान महत्त्वाचे आहे. यावर्षीचे घोषवाक्य ‘शाश्वत विकासासाठी सांख्यिकी’ ही आहे. राज्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या योजनांचे मुख्य स्त्रोत सांख्यिकी असते. त्यामुळे अचूक माहितीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातील स्त्रोतांचा अभ्यास करून नागरिकांसाठी माहिती उपलब्ध करण्यात येते. यामध्ये सांख्यिकी विभागाची भूमिका महत्त्वाची असते. कोरोना काळातही कर्मचाऱ्यांनी संकटाला न घाबरता जबाबदारी पार पाडली.

यावेळी श्री.गद्रे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सांख्यिकी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कौशल्याचा वापर करुन विशेष, नियोजनबद्ध कामकाज करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सांख्यिकी संचालनालयामार्फत विविध सांख्यिकी अहवालाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!