दैनिक स्थैर्य । दि.२३ मार्च २०२२ । सांगली । मतदान प्रक्रियेत विद्यार्थी आणि महाविद्यालयांचा सहभाग वाढवावा. महाराष्ट्रात 18 ते 19 व 20 ते 21 या वयोगटातील युवा वर्गाची संख्या जास्त आहे पण तुलनेने त्यांची मतदार नोंदणी कमी आहे. हा गॅप भरून काढणे व लोकशाही बळकटीकरणाच्या प्रक्रियेमध्ये युवा वर्गाचा महत्वपूर्ण सहभाग घेणे आवश्यक आहे. स्वीप कार्यक्रमांसाठी नाविण्यगपूर्ण संकल्पनांबरोबरच जाणीवपूर्वक आखणी झाली पाहिजे. त्यामध्ये विद्यार्थी आणि महाविद्यालयांचा सहभाग वाढविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी एम. बी. बोरकर, सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांनी लोकशाही बळकटीकरणात महत्वपूर्ण योगदान द्यावे यासाठी निवडणूक आयोग जाणीवपूर्वक विविधांगी प्रयत्न करीत आहे. निवडणूक प्रक्रियेबाबतची ओळख विद्यार्थ्यांना असावी यासाठी अशा पध्दतीचा अभ्यासक्रम पुणे विद्यापीठात येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होत आहे. शिवाजी विद्यापीठातही तो लवकरच सुरू होईल, असे सांगून मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिप प्रोग्रॅमबाबतही विचार सुरू असल्याचे सांगितले. या धर्तीवरच जिल्हास्तरावही इलेक्ट्रोल लिट्रसी क्लब सारखे महत्वपूर्ण प्लॅटफॉर्म अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. विद्यार्थ्यांना एकूणच मतदार प्रक्रियेमध्ये सहभागी ठेवण्यासाठी महाविद्यालये, विश्वविद्यालये यांच्यासोबत सातत्याने संवाद साधावा. विद्यार्थ्यांसाठी निरनिराळे कॅम्प, परिसंवाद आदि नाविण्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.
मतदार नोंदणी उपक्रमामध्ये बीएलओ हा या यंत्रणेचा कणा आहे. त्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहीत करावे. त्यांच्या कामांना अधिकाधिक गती देण्यासाठी यंत्रणेकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जावेत, असेही आग्रही प्रतिपादन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. 31 मार्च हा आंतरराष्ट्रीय ट्रान्सजेंडर दिवस म्हणून साजरा केला जातो. या सप्ताहात या घटकांमध्ये मतदान प्रक्रियेविषयक जनजागृती करावी. त्यांच्या नोंदणीसाठी कार्यशाळा, परिसंवाद घ्यावेत व निवडणूक यंत्रणा ही त्यांच्या सोबत आहे असा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करावा. यासाठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदार यादीमध्ये नाव असणे हा निवडणूक विषयक गंभीर गुन्हा असून अशा प्रकरणांमध्ये संबंधीतांना त्वरीत नोटीस जारी करावी व अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले. जिल्ह्यातील निवडणूक विषयक कामकाजाचा सविस्तर आढावा घेत असताना मतदान ओळखपत्रासाठी मतदारांचे रंगीत फोटो संकलनाचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे याबद्दल यंत्रणेचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. फॉर्म 6, 7, 8, 8अ बाबत आढावा घेत असताना या संबंधित 12 हजार 59 प्रकरणे असून यातील 2 हजार 329 प्रकरणे अद्यापही प्रलंबित आहेत. यातील 30 दिवसांपेक्षा जास्त प्रलंबित असणारी प्रकरणे मतदार नोंदणी अधिकारी यांनी अधिक लक्ष घालून त्वरीत निपटारा करावीत, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. मतदार यादीत एकसारखे फोटो असणारी 83 हजार 361 प्रकरणे असून याबाबीचा आढावा घेत असताना यातील त्रुटींच्या कारणांची विचारणा केली. अशा प्रकरणांमध्ये गरजेनुरूप फॉर्म ७ व फॉर्म 8 भरून घ्यावा व त्रुटींचा निपटारा त्वरीत करावा, असे त्यांनी निर्देशित केले.
यावेळी जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेकडील विविध कामांचा सविस्तर आढावा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी घेतला. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी निवडणूक प्रक्रियेशी संबंधित विविध कामकाजांचा सविस्तर आढावा सादर केला.