शासकीय दवाखान्यामधील प्रसूतीच्या प्रमाणात वाढ करा जिल्हाधिकारी शंभरकर यांचे निर्देश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सोलापूर, दि. ९ : जिल्ह्यात ० ते ६ वर्षे वयोगटातील लिंगगुणोत्तर ९६० इतके झाले आहे. आणखी मुलींचे प्रमाण वाढण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रभावीपणे उपाययोजना कराव्यात. शासकीय दवाखान्यातील प्रसूतीच्या प्रमाणात वाढ होण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय टास्क फोर्स बेटी बचाओ, बेटी पढाओ समितीच्या आढावा बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी महिला व बाल विकासचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सोमनाथ लामगुंडे, जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे, महिला व बाल विकास अधिकारी एन.एस. काळे, पोलीस उपनिरीक्षक सोनाली गोडबोले, गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ (पीसीपीएनडीटी) चे जिल्हा समन्वयक ॲड. रामेश्वरी माने, प्राथमिकचे उपशिक्षणाधिकारी मिलिंद मोरे, बालविकास प्रकल्प अधिकारी डॉ. विजय खोमणे, सुधीर ढाकणे आदी उपस्थित होते.

श्री. शेख यांनी जिल्ह्यातील ० ते ६ वर्षे वयोगटातील लिंग गुणोत्तरची तालुकानिहाय स्थितीची माहिती दिली.

श्री. शंभरकर म्हणाले, जिल्ह्यात शासकीय आरोग्य यंत्रणेचे जाळे मोठे आहे. बाळंतपणाचे प्रमाण वाढण्यासाठी १०७ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेबाबत जनजागृती करा. सांगोला आणि दक्षिण सोलापूर तालुक्याचे लिंग गुणोत्तर कमी असल्याच्या कारणांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (एनएचएफएस-५) मधील बाबींचे प्रमाण वाढण्यासाठी आरोग्य, शिक्षण आणि बाल विकास विभागाने करावे. सोनोग्राफी केंद्रांची धाडसत्रे करून वेळोवेळी तपासणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

श्री. शेख यांनी सांगितले की, जिल्ह्यातील अंगणवाड्यांना पोषण अभियान अंतर्गत आहाराचे वितरण करण्यात येत आहे. ९१३ अंगणवाड्या आयएसओ करण्याचे उद्दिष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले असून सामाजिक उत्तर दायित्व निधीमधून नियोजन सुरू आहे. कमी वजनाची बालके सामान्य स्थितीत येण्यासाठी ‘दत्तक पालक योजना’ राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील अंगणवाड्यांना १२ जानेवारी २०२१ पर्यंत जल जीवन मिशन १०० अंतर्गत नळाद्वारे पाण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती श्री. शेख यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!